bird flu मुळे हाय अलर्ट

0

कोचीन – कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली असताना देशात आणखी एका धोकादायक आजाराचा फैलाव सुरू झाला आहे. मध्य प्रदेश, राजस्थानल या राज्यांमध्ये आढळलेला बर्ड फ्लू (bird flu) आता हिमाचल आणि केरळमध्येही पसरला आहे. केरळमधील दोन जिल्ह्यात हाय अलर्ट (alert) घोषित करण्यात आला असून, बाधित पक्षी आढळून आलेला भाग आणि त्याच्या एक किमी परिघातील पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केरळ (kerala) मधील कोट्टायम व अलाप्पुझा जिल्ह्यातील काही भागात बर्ड फ्लूने बाधित झालेले पक्षी आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भागातील आणि त्याच्या एक किमी परिघातील कोंबडी व इतर पाळीव प्राण्यांना मारण्याचे निर्देश दिले आहेत. बर्ड फ्लू रोखण्यासाठी 40 हजार पक्ष्यांना ठार मारावे लागणार आहे. केरळने बर्ड फ्लूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे. अलापुझ्झाच्या जिल्हाधिकार्‍यांनी बदक, कोंबडी यांचे मांस व अंडी खाण्यावर बंदी घातली आहे. या दोनही जिल्ह्यात ज्या ठिकाणी स्थलांतरित पक्षी येतात त्याच्या 10 किमी परिघातील पक्षांवर वन खात्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.

हिमाचलच्या कांग्रा जिल्ह्यातील पोंग धरण तलाव क्षेत्रात आढळलेल्या काही स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे निदान झाले आहे. या पक्षांच्या मृतदेहाचे नमुने भोपाळमधील एका प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल एच 5 एन 1 ची पुष्टी करतो. राजस्थानातील झालावाड जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळला आहे. झालावाडमध्ये सर्वप्रथम बर्ड फ्लूची पुष्टी झाली होती. तिथे शेकडो कावळ्यांचा एकाचवेळी मृत्यू झाला होता. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मृत आढळलेल्या कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू विषाणूची पुष्टी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 150 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. कावळ्यांमधील संक्रमणाची पुष्टी झाल्यानंतर पोल्ट्री फॉर्मचीही चौकशी केली जात आहे. सुदैवाने मानवांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसलेली नाहीत.  हरियाणामध्ये गेल्या काही दिवसांत एक लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण बर्ड फ्लूचे असावे असा अंदाज आहे. मात्र, अद्याप नमुन्यांचा तपासणी अहवाल आलेला नाही. दरवर्षी कोंबड्यांना दिले जाणार्‍या रानीखेत लसीतील बिघाडमुळेही हे घडू शकते, अशीही शक्यता पोल्ट्री फार्म मालकांना वाटत आहे.

आतापर्यंत सहा राज्यात फैलाव
बर्ड फ्लूचा विषाणू देशातील सहा राज्यात पसरला आहे. र्ड फ्लूचा पहिला नमुना राजस्थानमधून पाठविण्यात आला होता. 28 डिसेंबरला त्याचा अहवाल पॉझिटीव्ह झाला. त्यानंतर केरळ आणि मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि झारखंडमध्येही हा विषाणू आढळून आला आहे.

निदान होण्यासाठी एकच प्रयोगशाळा
बर्ड फ्लूच्या प्रकारांचे निदान देशात केवळ भोपाळच्या आनंदनगरमधील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) उच्च सुरक्षा प्राणी रोग प्रयोगशाळेत होते. त्यामुळे देशभरातील असंख्य नमुने तपासणी करून घेण्यासाठी या प्रयोगशाळेकडे आले आहेत. त्यांचे निदान लवकर होण्यासाठी पाच संशोधकांचे एक विशेष पथक प्रयोगशाळेत 24 तास कार्यरत आहे.

Copy