काश्मिरात सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच; पुन्हा अनोख्या आघाडीची शक्यता

0

श्रीनगर : काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारसोबतची युती तोडण्याचा निर्णय भाजपाने घेतला. त्यानंतर काश्मीरमध्ये सत्तास्थापनेसाठी वेगवेगळी समीकरणे जुळविण्यात येत आहेत. एकमेकांना पाण्यात पाहणारे पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन पक्ष काँग्रेसच्या साथीने पुन्हा १६ वर्षानंतर एकत्र येण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरची पीपल्स डेमॉक्रेटीक पार्टी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. ओमर अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स या आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये 2002 मध्ये असे समीकरण बनले होते. यावेळी पीडीपी आणि काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केले होते आणि नॅशनल कॉन्फरन्सने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये मार्च 2015 मध्ये पीडीपी आणि भाजपा यांनी मिळून सरकार स्थापन केले होते. त्यावेळी मुफ्ची मोहम्मद सईद हे मुख्यमंत्री बनले होते. यानंतर काही महिन्यांतच त्यांचे निधन झाले होते. यानंतर त्यांची मुलगी मेहबूबा मुफ्ती बऱ्याच वादांनंतर मुख्यमंत्री बनल्या होत्या. अखेर यंदाच्या जूनमध्ये भाजपने राज्यातील दंगलीना जबाबदार धरत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

सत्तास्थापने ऐवजी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. 19 डिसेंबरला याला सहा महिने पूर्ण होत असून नियमांनुसार याला पुन्हा वाढविता येणार नाही. यानंतर राष्ट्रपती राजवट लावण्यात येऊ शकते. त्याआधी विधानसभा भंग करावी लागणार आहे. तिन्ही पक्षांच्या सुत्रांनी या समीकरणावर सकारात्मक संकेत दिले असून नॅशनल कॉन्फरन्सच्या सुत्राने सरकारमध्ये सहाभागी न होता बाहेरून समर्थन देण्यास आम्हाला काहीच आक्षेप नसल्याचे म्हटले आहे.

Copy