काशिराम पावरा यांच्या रूपाने भाजपाचा झेंडा फडकला

0

भिका चव्हाण

शिरपूर । विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालात विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विजयी झाले आहेत. काशिराम पावरा यांनी शिरपूर विधानसभा मतदार संघात तिसर्‍यांदा विजय संपादन केला आहे. तसेच अनेक वर्षांनी शिरपूर विधानसभा मतदार संघात काशिराम पावरा यांच्या रूपाने भाजपचा झेंडा फडकला आहे.

शिरपूर विधानसभा मतदार संघाची मतांची मतमोजणी मुकेशभाई पटेल टाऊन हॉलमध्ये मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणी 24 फेरीत 17 टेबलावर सकाळी आठ वाजेपासून अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. त्यात काशिराम पावरा यांनी आघाडी घेत शेवटच्या 24 व्या फेरीपर्यंत मताधिक्य वाढवीत विजयी झाले आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत शिरपूर विधानसभा मतदार संघाचा निकाल जाहीर झाला.

यावेळी शिरपूर विधानसभा मतदारसंघात सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. परंतु खरी लढाई भाजपाविरुद्ध भाजपाच यांच्यात होती. भाजपाचे बंडखोर डॉ.जितेंद्र ठाकूर व भाजपा काही दिवसांपूर्वीच दाखल झालेले माजी आमदार काशीराम पावरा यांच्यात मुख्य लढत होती. शिरपूर मतदारसंघात 1,63,538 पुरुष तर 1,57,021 महिला असे 3,20,559 मतदार होते.त्यापैकी 1,09,619 पुरुष व 1,01,286 महिला 2,10,995 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 65.79 टक्के मतदान केले होते. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम वेचान पावरा यांना 1 लाख 19 हजार 582 मते मिळाली आह. 48635 मताधिक्याने ते विजयी झाले आहे. त्या खालोखाल अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र युवराज ठाकुर यांना 70 हजार 947 मते मिळाली आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसचे रणजितसिंह भरतसिंह पावरा यांना 7 हजार 715 मते, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. मोतीलाल दामू सोनवणे 3 हजार 503 मते, भाकपचे इंजि. विकास कालिदास सैंदाणेला 2 हजार 127, मानव एकता पार्टीचे किशोर दौलत भिल 1 हजार 853 मते, बसपाचे सुक्राम ओंकार पावरा यांना 1 हजार 356 अशी मते मिळाली आहेत.