तनुश्री-नाना वादानंतर आता क्वीन कंगनाने केले विकास बहलवर हे गंभीर आरोप

0

मुंबई- तनुश्री-नाना प्रकरणानंतर बॉलिवूडमधील आणखी एक वाद समोर आला आहे. ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर एका तरूणीने छेडछाडीचा आरोप लावला आहे. आता या वादात क्वीन कंगना राणौतने उडी घेतली आहे. अभिनेत्री कंगना राणौतने पीडित तरुणीचे समर्थन करत विकास बहलवर आरोप केले आहेत. २०१५ मध्ये आलेल्या ‘बॉम्बे व्हेलवेट’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गोव्यातील ट्रिपदरम्यान विकास बहलने आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याबाबतची तक्रार तिने फॅटमचे मालक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधू मेंटना यांच्यापर्यंत पोहोचली. मात्र, तक्रारीनंतर कोणतीही कारवाई करण्यात आले नसल्याचंही तिनं म्हटलं आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.

क्वीन चित्रपटाची अभिनेत्री कंगनाने आपला एक अनुभव सांगताना पीडित महिलेची बाजू उचलून धरली आहे. त्या महिलेने केलेल्या आरोपात तथ्य आहे. आणि त्यावर मी पूर्णतः विश्वास ठेऊ शकते. २०१४ मध्ये ‘क्वीन’ सिनेमाचे शूटिंग करत होते, त्यावेळी विकास विवाहित होते. आपल्या जोडीदारासोबतच्या शारीरिक संबंधांबाबतच्या गोष्टी ते बऱ्याचदा माझ्यासोबत शेअर करायचे. मी त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर कोणतेही विधान, मत व्यक्त करत नाही, पण आपण अनुभवू शकतो की हे सर्व त्यांच्यासाठी एक व्यसन झाले आहे.

‘जेव्हा कधीही विकास मला भेटायचे तेव्हा विचित्र पद्धतीने मिठी मारायचे , माझ्या केसांचा सुगंध आवडतो, असे सांगायचे. त्यांच्या हालचालींवरुन त्यांच्या वागण्यात काहीतरी चुकीचे आहे, असे नेहमी वाटायचे. दरम्यान, आता फँटम सिनेमा संपल्यानंतर या प्रकरणावर सर्वाधिक चर्चा होत आहे.. पण यापूर्वीही हा मुद्दा उचलण्यात आला होता आणि अतिशय सहजरित्या हे प्रकरण दाबवण्यातही आले. मी तेव्हाही पीडितेला पाठिंबा दर्शवला होता.

विकास बहलने त्यावेळी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. ज्या महिलेने माझ्यावर आरोप केले आहेत, ती माझी चांगली मैत्रीण आहे. मी तिला कधी आणि कशा प्रकारे त्रास दिला, याबाबत विचारणा करणार आहे, मात्र सध्या माझेच शोषण होत असल्याचे त्याने म्हटले होते. पुन्हा एकदा उफाळून निघालेल्या या वादावर विकासकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, तनुश्री-नाना यांच्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील आणखी एक जुना वाद उफाळून आला आहे.