जळगाव जिल्ह्यात युवकांसाठी उद्योग समूह आणणार – वरूण सरदेसाई

जळगाव –  जिल्ह्यात युवकांची संख्या मोठी आहे. युवकांना उद्योगधंद्यांची गरज आहे. नोकरीसाठी युवक जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जातात. यामुळे युवकांना स्थानिक पातळीवर उद्योग मिळावेत यासाठी जळगाव जिल्ह्यात लवकरच उद्योगसमूह यावेत यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना मागणी करणार असल्याची घोषणा युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.

युवासेना सचिव वरून सरदेसाई ‘युवासेना निश्चय दौरा’ निमित्त बुधवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यातील युवा सेना पदाधिकारी यांना सिनेट निवडणुकीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते आले होते. यावेळी ते म्हणाले की विद्यापीठात दहा पैकी दहा जागा युवा सेनेला जिंकायच्या आहेत. नुकतीच मुंबई विद्यापीठात युवा सेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दहा पैकी दहा जागा जिंकल्या आहेत. हाच पराक्रम पुन्हा उत्तर महाराष्ट्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवा सैनिकांना करून दाखवायचा आहे. आणि युवा सैनिक ते नक्की करतील याचा मला विश्वास आहे.

पत्रकार परिषदेला पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शरद तायडे, महापौर जयश्री महाजन आदी उपस्थित होते.

युवा सेनेत कोणतेही गट नाहीत
मंगळवारी औरंगाबाद येथे झालेल्या युवा सेनेच्या कार्यक्रमात वरून सर्देसाई यांच्यासमोर शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाल्याचे दिसून आले होते. मात्र त्याठिकाणी कोणताही राडा झाला नसून केवळ ती धक्काबुक्की होती आणि ती शिवसैनिकांमध्ये झाले नसून दोन वैयक्तिक व्यक्तींच्या वैयक्तिक वादामुळे झाली होती असे सरदेसाई म्हणाले. याबाबतची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे यामुळे शिवसेनेत कोणताही वाद नसून याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये असेही ते म्हणाले

गेल्या निवडणुकी वेळी आम्ही लक्ष दिले नाही
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे केवळ विष्णू भंगाळे हेच निवडून आले आहेत. गेल्या वेळी आम्ही निवडणुकीमध्ये हवे तितके लक्ष न दिल्याने आम्हाला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले मात्र यंदा युवा सेना पूर्ण ताकदीने विद्यापीठाची निवडणूक लढणार आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी सरदेसाई यांनी दिली.