Private Advt

चाळीसगावात नदी पात्रातील घाणीमुळे नागरिक हैराण

चाळीसगाव– चाळीसगाव शहरात असलेल्या तितुर व डोंगरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात घाण साचली असून यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. घरे पाडलेले जुने मटेरियल, खराब झालेले अन्न, सडलेला भाजीपाला व यासह अन्य खराब वस्तू या नदीपात्रात टाकण्यात येत असतात. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पार्श्वभूमीवर याकडे चाळीसगाव पालिकेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून तितुर व डोंगरी नदीचे पात्र आहे. या दोन्ही नदीपात्राच्या काठालागत मोठी वस्ती असून याठिकाणी नागरिकांचा रहिवास आहे. परंतु ज्या नदीपात्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मेलेली जनावरे, शिळे अन्न, शहराच्या गटारी मधून काढण्यात येणारी घाण, पाडण्यात आलेले जुने घरांचे माती व इतर साहित्य हे सर्व नदीपात्रात टाकण्यात येत असते. यामुळे नदी पात्र हे घाणीच्या साम्राज्याने व्यापले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांना येथे राहणे मुश्किल झाली असून त्यातून प्रवास करताना नाकाला रुमाल लावावा लागत आहे. कोणाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने याची खबरदारी घेऊन तात्काळ नदीपात्र स्वच्छ करावे व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
अतिक्रमणामुळे नदीपात्र अरुंद
चाळीसगाव शहरात तब्बल दोन ते अडीच किलोमीटरचा नदीपात्र लाभले आहे. परंतु या नदीपात्राला पाटणादेवी रोड, शिवाजी घाट, दत्तवाडी यासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी अतिक्रमनाणे वेढा घातलेला आहे. तसेच नदीपात्रात अनेक अवैध धंदे देखील सुरू असल्याने याचा देखील नागरिकांना या ठिकाणी त्रास होत आहे. शहरात इतर ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे परंतु हे देखील अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे नदीपात्र अरुंद झाले असून ते काढण्याची मागणी ही नागरिक करत आहे.
– मुख्याधिकारी फोनच उचलेना
याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी यांना फोन केला असता त्यांनी फोनच उचलला नाही. यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
नदीपात्राच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. नदीपात्राची रेड लाइन ओलांडून हे काम करण्यात आले असून तीन वर्षांपासून खोलीकरण व साफसफाई देखील करण्यात आलेली नाही. याबाबत जिल्हा नियोजन समितीकडे संरक्षण भिंतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून येणाऱ्या काळात नदीपात्र खोलीकरण व साफसफाई करण्याचा मानस आहे.
                       – सूर्यकांत (बंटी) ठाकूर, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक चाळीसगाव नगरपालिका