भाजपा सोडणार असल्याची चर्चा निव्वळ अफवाच : नगरसेवक धीरज सोनवणे

जळगाव – जळगाव महापालिकेत शिवसेनेकडून भाजपाला एकामागून एक धक्के दिले जात असून, आतापर्यंत भाजपातून बाहेर निघालेल्या एकूण 30 नगरसेवकांनी शिवबंधन बांधले आहे. आणखीही काही नगरसेवक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे मात्र, त्यामध्ये मुद्दाम काही जणांची नावे गोवली जात आहेत, त्यांच्याविषयी अफवा पसरविल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक धीरज सोनवणे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना दिली.

महापालिकेतील राजकीय उलथापालथीमध्ये काही नगरसेवक हे अजूनही भाजपामध्ये टिकून आहेत, मात्र त्यांचे नाव मुद्दाम काही जणांकडून असंतुष्टांमध्ये घेतले जात आहे. त्यामुळे या नगरसेवकांबाबत पक्षात व जनतेत संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. ‘पक्ष सोडण्याचा माझा कुठलाही निर्णय नाही तरीही विरोधकांकडून माझे नाव हे भाजपा सोडण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये घेतले जात आहे आणि ते मुद्दाम पसरवले जात आहे, अशी प्रतिक्रिया धीरज सोनवणे यांनी ‘जनशक्तीशी’ बोलताना दिली.

Copy