कार्बो व्हेजमुळे सुधारू शकते शरीराची ऑक्सिजन घेण्याची क्षमता

0

अमित महाबळ (जळगाव)

रूग्णाच्या शरीरात ऑक्सिजनच्या योग्य त्या प्रमाणाअभावी निर्माण होणार्‍या परिस्थितीवर लक्षणांच्या आधारावर होमिओपॅथीमध्ये कार्बो व्हेज औषध उपयुक्त ठरू शकते. लक्षणांच्या अनुसार इतरही होमिओपॅथीक औषधी रुग्णास मदतीचा हात देऊ शकतात. परंतु, औषधाची मात्रा किती असावी आणि ते कसे घ्यावे हे वैद्यकीय तपासणीनंतरच निश्‍चित करता येते, अशी माहिती होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. पराग भागवत यांनी दिली. स्वतःच्या मनाने हे औषध घेऊ नये, असेही ते म्हणाले.

फुफ्फुसात तसेच मानवी शरीरात होणार्‍या विविध आजारांमुळे व त्यांच्यामुळे होणार्‍या बदलामुळे शरीराची ऑक्सिजन घेण्याची क्षमता आपोआप कमी होऊ लागते. मग फुफ्फुसाचे व संबंधित जुनाट आजार गंभीर झाल्यावर त्या रुग्णाला सावरण्यासाठी त्याच्या नातेवाईकांची धावपळ, पळापळ सुरू होते. स्टीच ईन टाईम सेव्हज नाईन अशी इंग्रजीत म्हण आहे. अश्या प्रकारच्या आजारांवर वेळीच/अगदी सुरुवातीस उपाय केले तर होमिओपॅथीक औषधाद्वारे तत्सम आजार चांगल्या प्रकारे आटोक्यात आणता येतात/बरे करता येतात. पण अश्याही गंभीर परिस्थितीत होमिओपॅथीक शास्त्रातील काही औषधे रुग्णांकरिता आशेचा किरण ठरु शकतात. होमिओपॅथीक शास्त्रात रुग्णांमधील लक्षणांनुसार त्याचा वापर केला जातो. अश्या अनेक औषधांपैकी एका औषधाचे नाव आहे कार्बो व्हेज. हे औषध कोळशाचा उपयोग करून बनवले जाते आणि ते साध्या, तसेच गंभीर स्वरूपाच्या आजारांवर वापरले जाते.
कार्बो व्हेजच्या लक्षणांमध्ये रुग्णात प्रामुख्याने जवळून व लवकर लवकर हवा घ्यावीशी वाटणे, रक्ताभिसरण व्यवस्थित न होणे, पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचे शरीर, त्वचा, नखे, हात, पाय निळे पडणे, शरीर थंड पडणे पण आतून गरम वाटणे, फुफ्फुसांचे व इतर जुनाट अशक्तपणा आणणारे आजार, रुग्णाची चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे, शारीरिक व मानसिक थकवा वाटणेे यांचा समावेश आहे.

लोकप्रिय उपचार पद्धती
जगभरात आज वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय उपचारपद्धती वापरात आहेत. होमिओपॅथीक ही त्यापैकी एक आहे. पांढरा रंग, आकाराने लहान व गोल दिसतात म्हणून या पॅथीमधील औषधे विशेषतः लहान मुलांमध्ये साबुदाणाच्या गोळ्या या टोपण नावानेही ओळखली जातात. डॉ. सॅम्युअल हॅनेमन हे होमिओपॅथीचे जनक आहेत. होमिओपॅथीक वैद्यकीय उपचारपद्धती बरीच लोकप्रिय आहे.