Private Advt

बैल गेला चोरीला ; गुन्हा दाखल

चाळीसगाव। तालुक्यातील वाकडी येथे गोठ्यात बांधलेला बैल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी, 13 रोजी उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पोलिसात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

सविस्तर असे, चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील सुनील वसंत पाटील (वय 42) हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असतात. शेती हा व्यवसाय असल्याने सुनील पाटील यांच्या मालकीचे खिल्लारी बैल जोडी आहे. त्यांना नेहमी घराजवळील गोठ्यात बांधलेले असतात. दरम्यान पाटील हे शुक्रवारी रोजी दिवसभर शेतात काम करून आले. बैलांना गोठ्यात बांधून झोपून गेले. मात्र, पाटील यांना 13 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास जाग आल्याने घराबाहेर आले. परंतु गोठ्यात बांधलेल्या बैलांमधून एकच बैल आढळून आला. त्यावर घरच्यांनी परिसरात शोधाशोध केल्यावर बैल मिळून आला नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने 15 हजार रुपये किंमतीचा एक बैल चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यावर सुनील वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादंवि कलम-379प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार संदीप माने करीत आहेत.