जी-२० शिखर परिषदेत मोदींनी सांगितले योगाचे महत्त्व

0

ब्यूनस आर्यस-जी-२० शिखर परिषदेसाठी ब्यूनस आर्यस येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील विविध देशातून आलेल्या शिष्टमंडळांना योगासनाचे महत्व सांगितले. जेव्हा व्यक्तिचा मेंदू शांत असेल तेव्हा कुटुंब, समाज, देश आणि जगातही शांतता कायम राहते. आरोग्य, कल्याण आणि शांततेसाठी जगाला भारताने दिलेली ही एक खास भेट आहे असे मोदींनी यावेळी सांगितले. ब्यूनस आर्यस येथे ‘शांततेसाठी योग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ‘शांततेसाठी योग’ (पीस फॉर योग) हे अत्यंत योग्य नाव दिले असून यापेक्षा दुसरे कुठलेच नाव योग्य ठरले नसते. योग आपल्याला चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य देते. आपला मेंदू आणि शरीर शांत ठेवण्याची ताकद या योगमध्ये असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी हे काल सांयकाळी अर्जेंटिनाला पोहोचले. ते चार दिवसांच्या दौऱ्यावर असून २ डिसेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा येथे आयोजित हॉकी विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानिमित्त अर्जेंटिना संघाचे अभिनंदन केले आणि भारतीय हॉकी संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जी-२० शिखर परिषदेत जागतिक मुद्दे, निरंतर विकास, जलवायू परिवर्तन, फरार आर्थिक घोटाळ्यातील आरोपींसारख्या मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे मोदी म्हणाले. हे फक्त भारत किंवा अर्जेंटिनाच्या फायद्याचे नाही तर यात जगाचे हित असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी पंतप्रधानांची सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान अल सौद यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली.

Copy