अखेर भाजपाचे माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना अटक

0

नवी दिल्ली: भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना बलात्काराच्या आरोपानंतर अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी शाहजहांपूर येथून अटक केली. वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर चिन्मयानंद यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून एसआयटी पथक देखील रुग्णालयात आहे.

उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील वकिल शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्कार केल्याचा तसंच एक वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती निर्वस्त्र होऊन मसाज करुन घेत असल्याचे दिसत आहे. ही व्यक्ती स्वामी चिन्मयानंद असल्याचा दावा केला जात आहे. या आरोपांनंतर गेल्या शुक्रवारी एसआयटीच्या पथकाने जवळपास सात तासांपर्यंत चिन्मयानंद यांची चौकशी केली होती.

बुधवारी, पीडित तरुणीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, जर चिन्मयानंद यांना अटक नाही झाली तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. पीडित तरुणीने एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्त करत चिन्मयानंद यांच्याविरोधात कारवाई कधी केली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. तरुणीच्या या वक्तव्यानंतर एसआयटीने बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी, एसआयटी कोणाच्या भावनांनुसार किंवा कोणाच्या अपेक्षेनुसार तपास करणार नाही. तथ्ये आणि विधानांच्या आधारे एसआयटी चौकशी करत आहे. सर्व बाजूंनी संयम साधण्याची गरज असल्याचे एसआयटीचे आयजी नविन अरोरा म्हणाले होते. २३ तारखेला या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल अशी माहिती त्यावेळी एसआयटीकडून देण्यात आली होती. पण त्यापूर्वीच आता चिन्मयानंद यांना अटक झाली आहे.

Copy