बघता… बघता… पाच लाखांचा ऐवज लंपास

  • शिरपूरमधील घटना

 

  • वरपित्यासह नवरी मुलीच्या काकांना फटका

 

  • अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल

 

शिरपूर – चोरट्यांनी अनेक वर्‍हाडींच्या डोळ्यांदेखत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल बघता बघता लुटून नेल्याची घटना शनिवारी, शिरपूर शहरात घडली. एका तरुणाने या चोरट्यांना हटकले देखील होते पण त्यालाही चोरट्यांनी चकवले. त्यानंतर लुटीची घटना उजेडात आली परंतु, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री नवरीच्या काकांचे 8 हजार रूपये खोलीमधून लंपास झाले.

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी व हल्ली मुक्काम नाशिक येथील रहिवासी मनोहर रंगराव सोनवणे यांचा मुलगा राहुल आणि शिरपूर येथील प्रवीण पवार यांची मुलगी हर्षदा यांचे लग्न शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळील मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉलमध्ये 26 फेब्रुवारीला होते. लग्नाचे विधी आटोपल्यावर सोनवणे यांनी मंगल कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील खोलीत असलेल्या बॅगमध्ये 1 लाख 16 हजार रुपये, तसेच पत्नीच्या 3 लाख 84 रुपये किंमतीचे 6 तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल ठेवला. त्यांनी बाहेरून खोलीला कुलूप लावून घेतले. खोली बाहेरून बंद असताना चोरट्यांनी खिडकी उघडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असलेली बॅग लांबविली. हा प्रकार घडत असताना लग्नात आलेल्या एका तरुणाने या चोरट्यांना हटकले. त्याने ‘बॅग कुठे नेत आहात’, अशी विचारणाही केली. त्यावर चोरट्यांनी ही बॅग खाली मागवली असल्याचे उत्तर तरुणाला दिले आणि तेथून ते पसार झाले.

थोड्या वेळाने बिदाईचा कार्यक्रम होणार असल्यामुळे सोनवणे हे सामान आणण्यासाठी खोलीमध्ये गेले मात्र, त्यांना बॅग आढळून आली नाही. त्यांनी लागलीच कुटुंबात विचारणा केली असता, चोरीची घटना उघड झाली. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नवरीच्या काकाचे 8 हजार रूपये खोलीमधून लांबविण्यात आले होते. शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल आली आहे़

Copy