शेतकरी राजाचा खेळ मांडियेला

नाशिक –
रासायनीक, जैविक, विषमुक्त,वैदिक अशा अनेक पातळ्यांवर पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्र (कुत्र्याची छत्री) सारखे शेती करण्यासाठी मार्गदर्शक तयार झाले आहे.या सर्वांनी आपापल्या पद्धतीने धंद्याचे दुकान थाटले आहे, गिऱ्हाईक मात्र एकच शेतकरी हाती गावले आहे. यातच माझा शेतकरी राजा भरडला जात आहे.
शेतीतून दोन पैसे हाती मिळावे म्हणून शेतकरी राजा या ना त्या पद्धतीने शेती करीत आहे. उत्पन्न कमी मिळते म्हणून परंपरागत शेती सोडून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी रासायनिक शेतीच्या आहारी गेल्यामुळे जमिनीचा कस दिवसेनदिवस उतरत आहे. लवकरात लवकर व जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी रासायनिक खतांचे दुकानदार शेतकरी राजाच्या स्वागताला टपून आहे, कारण त्याला माहिती आहे आपल्यावर विश्वास ठेवून आपण दिलेले बी -बियाणे खते घेऊन तो शेती करणार आहे.या व्यवहारात आपल्याला पैसा मिळणार आहे.
या व्यवहारात मोठी टोळी कार्यरत आहे.यामध्ये कमिशन नावाची मोठी भानगड आहे. 35 ते 40 टक्के कमिशनवर हा धंदा सुरू असून शेतीत राबणारा शेतकरी मात्र एकटाच आहे. त्याच्याकडून मिळणारा पैसा या टोळीतील सर्वांसाठी आहे. शेतकऱ्याची किंमत मात्र कोणालाही नाही.
याच गडबड गोंधळात रासायनिक, जैविक ,विषमुक्त,वैदिक अशी नामावली घेऊन अनेक दुकानदार त्याच्यासमोर दत्त म्हणून हजर आहे.
नेमकी शेती करायची कशी ? या विवेंचनेत शेतकरी सापडला आहे. सर्वच संभ्रमावस्था निर्माण झाली असून गोंधळात गोंधळ उडाला आहे.या संधीचा पुरेपूर फायदा जो तो दुकानदार आणि कंपन्या आपल्या पद्धतीने घेत आहे.
अस्मानी आणि सुलतानी संकटांशी सामना करत शेतकरी राजा उन,वार,पाऊस, थंडी आणि शासनाच्या जुलमी रात्रीच्या वीजपुरवठयात अर्धपोटी राहून काबाड कष्ट करत आहे.दोन पैसे मिळवून कर्ज फिटेल या आशेवर लाखो रुपये मातीआड करत नसिब आजमावत आहे.
शेतकऱ्यांचा खिशातून पैसे काढणाऱ्या एकाही कंपनीला अथवा, पिकाचे शेड्युल ठरवून देणाऱ्यांना किमान होतकरू, शेतीत नविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे वाटत नाही. प्रथम ते धंदाच पहात आहे.शेतकऱ्या सारखा प्रामाणिक माणूस नाही. शेतीतील पिक निघाल्यानंतर सर्व प्रथम तो काय करत असेल तर, आपल्यावर असलेले कर्ज कसे फिटेल.याचाच विचार करून नंतर घरातील मुलांना खाऊ नेत असेल. हे त्रिवार सत्य आहे. या उलट कर्ज बुडविनारे पुढारी त्यांच्या संदर्भात न बोललेलेच बरे.का आपले शब्द घालवायचे?
अशा या बिकट परिस्थितीत शेतकरी राजाला शेतीतून उत्पन्न घ्यावे लागत आहे . रासायनिकमुळे आपली पुढील पिढी बरबाद होणार आहे. जमिनीचा कस गेल्यामुळे माणसाचं पोट बिघडल आहे. रासायनीकची आस सोडून शेतकऱ्यांनी आता जैविक सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे या शेतीतून निघणाऱ्या उत्पादनामुळे आपली भावी पिढी सुदृढ होणार आहे याचा विचार करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती म्हणजेच विषमुक्त शेती करणे हीच खरी काळाची गरज आहे. यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडून गळेलठ नफा कमवलेल्या कंपन्यांनी होतकरू तरुण प्रयोगशील शेतकरी राजाच्या पाठीमाघे भक्कम उभे राहण्याची गरज आहे.तरच ते करत असलेल्या सामाजिक दाईत्वचा उपयोग होणार आहे. विषमुक्त शेती करण्यासाठी शासनाने शेतीतील पिका संदर्भात तयार केलेले नियम बदलवून शेतीच्या बांधावर येवून नियम करणे गरजेचे आहे.तरच आपल्या भावी पिढीचे भवितव्य अवलंबून आहे.