बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना ११०० कोटींची मदत

0

मुंबई :- राज्य सरकारकडून बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच ११०० कोटींची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात ४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३४ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त नुकसान विदर्भात झाले आहे. राज्य सरकारकडून केंद्राला ३,३७३ कोटीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संबंधित मदत येण्याआधी सरकारने स्वत:च्या हिश्शाची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

कीटकनाशकांमुळे भात व इतर खरीप पिकाचेही नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची यादी तयार करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही मदत पुढच्या आठवड्यात जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

नागपूर येथे २२ एप्रिलला कापसावरील बोंडअळीच्या व्यवस्थापनाबाबत बैठक झाली होती. या बैठकीला केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आदी उपस्थित होते. यावेळी पांडुरंग फुंडकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत देणार असल्याचे त्यांनी बैठकीनंतर जाहीर केले होते.

Copy