शिवसेना आमदारांची उद्या तातडीची बैठक

0

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तेचा पेच प्रसंग अद्यापही कायम असून, राष्ट्र्वादि कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. दरम्यान कॉंग्रेस मधील एक गट शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. भाजपाने काहीशी नरमाईची भूमिका घेतली असली तरी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर ते ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या मातोश्री निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

गुरुवारी होणाऱ्या या बैठकीत राज्यामध्ये सध्या निर्माण झालेला सत्तावाटपाचा तिढा, भाजपासोबत वाटाघाटी करण्याबाबत आमदारांची भूमिका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास त्याचे स्थानिक राजकारणावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम, भाजपाबाबत शिवसेना आमदारांचे असलेले मत याबाबत चर्चा होणार आहे.

राज्यातील सत्तास्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत घेतलेली ठाम भूमिका आणि भाजपाने त्यास दिलेला नकार यामुळे बहुमत मिळूनही युतीचे घोडे अडकून पडले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडूनही विरोधात बसायचे की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा याबाबत परस्परविरोधी विधाने करण्यात येत असल्याने राज्यातील सत्तेचा पेच प्रसंग अधिकच वाढला आहे.

Copy