वीजवाहिन्यांच्या गर्दीने नागरिकांचे जीवन धोक्यात

0

ठाणे : ठाणे शहरातील वीजवाहक खांबांवरील वीजवाहिन्या यापूर्वीच भूमिगत पद्धतीने टाकल्या गेल्या आहेत. मात्र महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहरातीलच संत ज्ञानेश्वरनगर व वागळे इस्टेट या सुमारे दिड लाख लोकवस्ती असलेल्या भागातील वीजवाहक खांबांवरून टाकलेल्या वीजवाहिन्या दाटीवाटीने आजही तशाच लटकत असल्याने येथील नागरिकांच्या जीविताचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे शहर एकीकडे स्मार्ट होत चालले आहे. अनेक विकासप्रकल्प आज शहरात राबवले जात आहेत. मात्र याच शहराचा भाग असलेला संत ज्ञानेश्वरनगर व वागळे इस्टेट परिसर हा बहुतांशी चाळवजा वस्ती असलेला असून काही प्रमाणात येथे इमारती देखील आहेत. या भागाची लोकसंख्या सुमारे दिड लाखाच्या घरात आहे. गरीब व मध्यमवर्गीय लोकांची वस्ती म्हणून हा परिसर ओळखला जातो. ठाण्यातील बराचशा भागातील वीजवाहक खांबांवरून टाकल्या गेलेल्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. मात्र संत ज्ञानेश्वरनगर व वागळे इस्टेट परिसरात आजही वीजवाहिन्या वीजवाहक खांबांवरून वेड्यावाकड्या- लटकलेल्या अवस्थेत आहेत. येथील रस्ते अरुंद असून रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला बेसुमार वीजवाहिन्या टाकल्याने त्यांची दाटी झाली आहे. रस्त्या रस्त्यावर व चालीचालीतील घरांवरून वीज वाहिन्या कुठूनही कशाही टाकण्यात आल्या आहेत. काही वीजवाहक वीजवाहिन्या तर घरांना लागलेल्या आहेत. या वीजवाहिन्या तातडीने भूमिगत पद्धतीने टाकण्यात याव्यात अशी मागणी माजी नगरसेवक संजय दळवी यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता के. बी. सोनपराते यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सौन्दर्यीकरणाला बाधा
अशा वेड्यावाकड्या टाकलेल्या वीजवाहिन्यामुळे, तसेच शहरात काही भागात रस्ते ओलांडून विविध प्रकारच्या खाजगी केबल वायर टाकण्यात आल्या आहेत. परिणामी शहराच्या सौन्दर्यीकरणाला बाधा पोहोचत आहे.

जीवितहानीचा धोका
दाटीवाटीने टाकलेल्या वीजवाहिन्यांमुळे अपघात होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. वादळ सदृश्य स्थितीत व पावसाळ्यात वीजवाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन स्पार्क होणे, शॉर्टसर्किट होऊन ओव्हरहेड वायर रस्त्यावर पडणे, वीज पुरवठा खंडित होणे. काही विजेचे खांब हे एका बाजूला झुकलेले व वाकलेले असल्याने हा धोका अधिकच वाढला आहे.

आंदोलनाचा इशारा
महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे संत ज्ञानेश्वरनगर व वागळे इस्टेट भागात ओव्हरहेड वीज वाहिन्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्या तातडीने भूमिगत करण्यात याव्यात. अन्यथा महावितरण विरोधात आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक संजय दळवी, निलेश महाडिक, बिभीषण देवकर यांनी निवेदनात दिला आहे. काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महावितरण कंपनीवर राहील असेही त्यांनी बजावले आहे.