धक्कदायक: एनसीबीच्या पथकावर ६० जणांच्या टोळीकडून प्राणघातक हल्ला

0

मुंबई: अमली पदार्थ प्रतिबंधक पथकावर ड्रग्ज तस्करांच्या ६० जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एक अधिकारी जखमी झाले आहे. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

गोरेगाव येथे हा प्रकार घडला. एनसीबीचे पाच जणांचे पथक कॅरी मेंडीस नावाच्या ड्रग्ज तस्कराला अटक करण्यासाठी गेले असता हा हल्ला झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी कॅरी मेंडीस आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींविरोधात आयपीसी कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर ड्रग्स प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी कॉमेडीयन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा मारला होता. यावेळी भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला होता. भारती आणि हर्ष दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Copy