डॉ.मणिभाई देसाई आणि उरुळी कांचन

साल १९४६ महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत.खेडेगाव आपल्या पायावर उभे राहीले तर भारत उभा राहील ही संकल्पना‌.गांधीजीनी सर्वांना आव्हान केले खेडेगावात चला.या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक तरुण खेडेगावाच्या दिशेने निघाले त्या पैकी एक म्हणजे डॉ.मणिभाई देसाई

डॉ.मणिभाई चा जन्म गुजरात मधील सुरत जिल्ह्यातील कोसमांडा या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात झाला.लहाशपणीच वडीलांचे छत्र हरपल्यामुळे डॉ.मणिभाईचे पालन पोषण मोठ्या भावाने केले.डॉ.मणिभाई शिक्षणात लहान पणा पासुनच हुशार होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती.मोठे भाऊ स्थानिक कापडाच्या मिल मध्ये चांगल्या हुद्द्यावर होते.डॉ.मणिभाईनी इंजिनिअरिंग करुन आपल्या सारखीच नोकरी करावी अशी बंधुची इच्छा होती.डॉ.मणिभाईनी ते न करता सुरत मधील कॉलेज मध्ये फिजिक्स व गणित विषय घेऊन उच्च शिक्षण पुर्ण केले.

१९४२ महात्मा गांधीचे ब्रिटिश सत्ते विरोधातील आंदोलन चालू होते.डॉ.मणिभाई पण स्वतःला त्या पासून अलिप्त ठेऊ शकले नाहीत.गांधीजीच्या ब्रिटीश चले जाओ आंदोलनात हा उच्च शिक्षित तरुण सहभागी झाला.गांधीजीच्या अनेक आंदोलनात डॉ.मणिभाईनी सहभाग घेतला,त्यात त्यांना कारावास पण भोगावा लागला.१९४६ साली निसर्गोपचार आश्रमच्या माध्यमातून डॉ.मणिभाई उरुळी कांचन मध्ये आले व महात्मा गांधीजींच्या संकल्पनेतील ग्रामविकास करण्यासाठी, खेडेगावे स्वयंपूर्ण पणे उभे करण्यासाठी त्यांनी उरुळी कांचन ची निवड केली.१९४६ ते १९९३ मृत्यू पर्यंत ते उरुळी कांचन मध्ये राहिले.एक उच्च शिक्षित तरुण त्याकाळी ठरवले असते तर कुठेही मोठी नोकरी कुठेही मोठा उद्योग व्यवसाय करु शकले असते पण त्यांनी सर्व काही त्याग करुन समर्पित मनाने समाज सेवेची निवड केली.

डॉ.मणिभाईनी उरुळी कांचन मध्ये महात्मा गांधीजीच्या हस्ते निसर्गोपचार आश्रम स्थापन केले.निसर्गोपचार आश्रम मध्ये देश-विदेशातुन रुग्ण येतात.आश्रमच्या माध्यमातून उरुळी कांचनचे नाव जागतिक पातळीवर पोहचले.

देश नुकताच स्वतंत्र झालेला ग्रामीण भागात शिक्षणाची कोणतेही सुविधा नव्हती.चावथीच्या पुढे शिक्षण घेण्यासाठी शहरात जावे लागत असे.प्रत्येकाला ते शक्य होत नव्हते.बहुसंख्य मुले शिक्षणापासून वंचित राहत.प्रत्येक मुलांना शिक्षण मिळावे या उद्देशाने डॉ.मणिभाईनी महात्मा गांधी सर्वोदय संघाची स्थापना केली,त्या माध्यमातून उरुळी कांचन व परिसरातील मुली,मुले शिक्षण घेऊ शकली.आज संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई महाविद्यालय, डॉ सायरस पुनावाला स्कुल,बी.जी शिर्के मराठी माध्यमिक या शाखेतुन जवळपास १० हजार हुन अधिक विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेत आहेत.मणिभाईनी दुरवरच्या मुलांना शाळेत येणं शक्य नाही अशा मुलांसाठी ग्रामीण भागातील पुणे जिल्हा तील पहिले वसतीगृह ही उरुळी कांचन येथे चालु केले.

उरुळी कांचन व परिसर मुख्य व्यवसाय हा शेती असणारा.काळाची गरज ओळखुन त्यांनी ग्रामविकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेची स्थापना केली.संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन लक्षात घेऊन गुळ उत्पादन चालु केले.संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लिफ्ट इरेगेशनसाठी सिमेंट पाईपच्या कारखाना चालू करुन जिरायती शेती असलेला भाग बागायती करण्याचा प्रयत्न केला.आज ग्रामविकास विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था ही पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत संस्था आहे.

डॉ.मणिभाईनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिता साठी कै.आण्णासाहेब मगर यांच्या साथीने थेऊरच्या माळरानावर महाराष्ट्रातील दुसरा सहकारी साखर कारखाना चालू करुन हवेली तालुक्याचा कायपालट केला.

पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नारा दिला जय जवान जय किसान.डॉ.मणिभाईनी कायम आपल्या समाज सेवेचा केंद्रबिंदू हा शेतकरयांना समजले आहे.शेतीची उत्पादन वाढले पाहिजे, फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीला अजुन जोडधंदा आवश्यक आहे हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन (BAIF) ची स्थापना केली.बायफच्या माध्यमातून त्यांनी जर्सी गाई या प्रथम भारतात आणल्या व आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जर्सी गाई आहे.आज भारत हा दुध उत्पादनात स्वावलंबी झालाय त्यांचे सर्व श्रेय हे डॉ.मणिभाईना आहे.म्हणुनच त्यांना धवल क्रांतीचे जनक म्हटले जाते.गुजरत येथील प्रसिद्ध अमुल डेअरीचे वर्गिस कुरियन हे डॉ.मणिभाईचे शिष्य होते.आज बायफ ही संस्था जागतिक पातळीवर काम करतीय.आज भारतातील प्रत्येक खेडेगावात बायफ संस्थाने शेतीशी निगडित काही ना काही कार्य केलेले आहे.

डॉ.मणिभाईनी उरुळी कांचन ग्रामपंचायतचे बिनविरोध सरपंच म्हणून ३० वर्षे काम केलेले आहे.आज उभे असलेले ग्रामपंचायत कार्यालय हे त्यांच्याच कार्यकाळातील आहे

कोणताही पुरस्कार एखाद्या व्यक्तीला दिला जातो त्या मुळे त्या व्यक्तीची उंची वाढते पण अशा काही व्यक्ती असतात की त्यांना पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराची उंची वाढते ते म्हणजे डॉ.मणिभाई देसाई.डॉ.मणिभाईना त्यांच्या कार्या मुळे अनेक पुरस्कार मिळाले.पद्मश्री,रोमन मॅगसेसे, जमनालाल बजाज असे अनेक पुरस्कार.त्याच्या कामाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली

डॉ.मणिभाईनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःला समाज सेवेसाठी समर्पित केले.आयुष्यभर गांधीजींच्या विचारांची बांधिलकी ठेवली.विविध संस्था स्थापन करून सुद्धा आपल्या मृत्यूनंतर एक रुपया ही मागे ठेवला नाही कि आपल्या वारसांना काही लाभ दिला.ते अविवाहित होते. डॉ.मणिभाई चे नाव घेणं, डॉ.मणिभाई सारखे कपडे घालणे, डॉ.मणिभाईच्या नावाचा लाभ घेणे सोपे आहे पण डॉ.मणिभाई सारखे सामजासेवेला जीवन समर्पित करणे,त्याग करणे सोपे नाही.आज डॉ.मणिभाईचा १०३ वा जन्म दिवस.त्यांनी उभ्या केलेल्या संस्था आपण जतन करणे, त्यांच्या संस्था टिकवणे, संस्थेचा लौकिक वाढवणे हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल

श्रीकांत ज्ञानदेव कांचन

सहकोशाध्यक्ष पुणे भारतीय जनता पार्टी