कोरोना : खोट्या अविर्भावात राहू नका; वैद्यकीय तज्ज्ञांचा जळगावकरांना इशारा

1

गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी दोन हात करणारे आरोग्य सेवक, प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा यांच्या अथक प्रयत्नांमुळे आपण कोरोना विषाणूला काही प्रमाणात रोखू शकलो आहे. परंतु आता लस आली आहे, मला काही होत नाही, लग्न सोहळ्यात केवळ जवळचेच लोक असतात त्यामुळे मास्क नसला तरी चालतो अशा खोट्या अविर्भावात राहून आपण कोरोना योध्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांवर पाणी फिरवत आहोत. नागरिकांची अशी ही बेफिकिरी समाजाला परवडणारी नाही. ही बेफिकिरी घातक ठरू शकते. पाश्चिमात्य देश अशा बेफिकिरीचे दुष्परिणाम भोगत आहेत.

नागरिकांनी काळजी घ्यावी, अन्यथा

नागरिकांनी कोरोनाचे नियम स्वयंस्पृर्तीने पाळले पाहिजे. प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांच्यावर आपल्या बेफिकिरीमुळे ताण येणार नाही याची काळजी घ्या. लस घेतली असेल तरी मास्कचा वापर, सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायझरचा वापर विसरू नका.अन्यथा पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढून आरोग्य सेवकांवरील कार्याचा भार देखील वाढेल आणि पुन्हा कोरोना सेंटर, विलगीकरण सेंटर सुरू करावे लागतील. काही प्रमाणात सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागतील. मुलांचे शैक्षणिक वर्ष असेही कमजोर झालेले आहे, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळा पुन्हा बंद होतील.मित्र परिवारापासून मुले दुरावतील, म्हणजे मानसिक स्वास्थ्य देखील कमजोर होईल. त्यासोबतच पुन्हा ऑनलाईन शिक्षण हे डोळ्यांवर विपरीत परिणाम करतच राहील. साखरपुडा, लग्न सोहळे मोजक्या लोकांच्या उपस्थित कोरोनाचे नियम पाळून पार पाडा.सामूहिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन टाळा. राजकीय, सामाजिक सभा, दौरे यांनादेखील तूर्त पूर्णविराम देणे गरजेचे आहे. महिलांनी हळदीकुंकू सारखे कार्यक्रम टाळावे. बाजारपेठेत विना मास्क फिरू नका. दुकानदारांनी विना मास्क ग्राहकांना परवानगी देणे टाळावे तसेच स्वतः देखील मास्क सक्तीने वापरावा. हॉटेल मध्ये जातांना देखील मास्क,सॅनिटायझर,डिस्टन्स हा त्रिसूत्री नियम पाळलाच पाहिजे. राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. ताप, सर्दी असल्यास कोरोना ची चाचणी करून घ्या,त्वरित डॉक्टरांकडून उपचार सुरू करा. केवळ डॉक्टर, प्रशासन आणि पोलिसांचे हे कर्तव्य नसून समाजहितासाठी समाज्यातील प्रत्येक घटकाने कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा

भारत सरकार द्वारे कोरोना विरुद्ध सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत सर्व आरोग्य सेवकांनी आपला सहभाग नोंदवावा आणि इतरांना देखील लस घेणेसाठी प्रवृत्त करावे.कोव्हीशिल्ड किंवा कोव्हक्सींन या लसीचे दोन डोस घेतल्यावर जास्त प्रमाणात संरक्षण मिळू शकते. जास्तीत जास्त लसीकरण करून हर्ड इंमुनिटी तयार होऊन या विषाणू वर आपण नक्कीच मात करू शकतो. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क,सॅनिटायझर आणि सोशल डिस्टनसिंग चे पालन सक्तीने करणे क्रमप्राप्त आहे.

– डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ञ, जळगाव (9423187486)

Copy