धुळे पोलिस भरती : १ जागेसाठी ८१ जणांमध्ये स्पर्धा

जिल्हा पोलिस दलातील १६ रिक्त जागा भरण्यासाठी रविवारी शहरातील सहा परीक्षा केंद्रांत लेखी परीक्षा झाली. सर्व केंद्रांत १ हजार ३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली. एका जागेसाठी ८१ उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. तसेच लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करणाऱ्या २८९ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरवली.

पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरले गेेले होते. सुमारे २ हजार ९९७ जणांनी अर्ज भरले होते. प्रत्येक केंद्राबाहेर बंदोबस्त होता. प्रत्येक केंद्रात एक पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त होते. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी सर्व परीक्षा केंद्रांची पाहणी केली. प्रवेशपत्र तपासल्यावरच उमेदवारांना केंद्रात सोडण्यात आले. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या २ हजार ९९७ पैकी १ हजार ३०८ उमदेवारांनी परीक्षा दिली. परीक्षेत गैरप्रकार होऊ नये यासाठी केंद्राच्या दोनशे मीटर परिसरातील झेराॅक्स, फॅक्स, ई- मेल, इंटरनेट केंद्रे बंद ठेवण्यात आली होती.