फडणवीसांनी काँग्रेसला दाखवला आरसा; महाराष्ट्रापेक्षा नऊ राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त

काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स

मुंबई – देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्याचा निषेध म्हणून काँग्रेसने सायकल मोर्चा काढला. पण हा मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे, अशी टीका भाजपा नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर हे गुजरातसह नऊ राज्यांच्या तुलनेत 10 रुपयांनी अधिक आहेत. देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर असणार्‍या राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे, असा दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्रामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर राज्याचा 27 रुपये कर आहे, तर केंद्र सरकारचा एकूण कर 33 रुपये आहे. केंद्राच्या करातील चार रुपये हे कृषी सेस, चार रुपये डीलर कमिशन आहे. उर्वरित पैशांपैकी 42 टक्के पैसे केंद्र सरकार राज्यांना परत करते. राज्य सरकारने मात्र 27 रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावलेला आहे, अशी आकडेवारीच फडणवीस यांनी मांडली. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष आ. नाना पटोले यांचे आंदोलन हे राज्य सरकारच्या विरोधात असायला हवे. 27 रुपयांचा टॅक्स कमीत कमी करावा किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान 10 रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त करावे या मागणीसाठी त्यांनी आंदोलन करायला हवे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. पटोले फार हुशार आहेत.

श्रेय घेण्यासाठी सायकल मोर्चा

येत्या बजेटमध्ये अजित पवार दोन-तीन रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे कर कमी करणार आहेत, अशी चर्चा माध्यमात आहे. त्याचे श्रेय घेण्यासाठी पटोलेंनी सायकल मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे, असेही फडणवीस म्हणाले.

नाना पटोलेंच्या नेतृत्वात सायकल मोर्चा

इंधन दरवाढीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात पक्षाचे आमदार व मंत्री सायकलने विधानभवनात आले. केंद्र सरकार लुटारुप्रमाणे वागत आहे, अशी टीका काँग्रेसने केली.

 

केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून, महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदार यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल चालवत विधानभवनात जाऊन मोदी सरकारचा निषेध केला.

 

Copy