नंदुरबारच्या देवरे दाम्पत्यांचा झेंडा अटकेपार

बेबी बर्थच्या दुसऱ्या चाचणीला लवकरच होणार सुरुवात; दाम्पत्यांचे सर्वत्र कौतुक

नंदुरबार l रेल्वेने प्रवास करताना सातत्याने लहान बाळासोबत असलेल्या मातेला अडचणींचा सामना करावा लागत होता. रेल्वेतील सीटवर जागेच्या कमतरतेमुळे मातेला बाळासोबत झोपण्यासाठी गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन नंदुरबार येथील प्रा. नितीन देवरे व हर्षाली देवरे या दाम्पत्याने अनोख्या पद्धतीने रेल्वेतील बेबी बर्थ तयार केला. लखनऊ मेलमधील पहिल्या चाचणीच्या फीडबॅक व सोशल मीडियाच्या सूचनांचा विचार करून बेबी बर्थचा नवीन आराखडा तयार केला आहे. यासंदर्भात नुकतीच नवी दिल्ली येथे प्रा. नितीन देवरे व रेल्वे बोर्डातील अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. त्यामुळे दुसऱ्या चाचणीनंतर लवकरच भारतीय रेल्वेत बेबी बर्थ नवीन रूपात पहायला मिळणार आहे. त्यामुळे नंदुरबारच्या देवरे दाम्पत्यांचा झेंडा अटकेपार पोहचणार आहे.

प्रा. नितीन देवरे येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सेवार्थ तर हर्षाली देवरे या गृहिणी आहेत. संस्थेचे चेअरमन अँड. रमणलाल शाह, सचिव डॉ. योगेश देसाई, प्राचार्या सुषमा शाह, मनीष शाह यांनी प्रा. नितीन देवरे यांचा सत्कार करून कौतुक केले. रेल्वेतील बेबी बर्थमुळे नंदुरबारचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात उज्ज्वल झाले. या प्रकल्पामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या असंख्य मातांनी समाधान व्यक्त करून नंदुरबारच्या देवरे दाम्पत्यांचे कौतुक केले आहे.