दिल्ली हिंसाचार प्रकरणी २२ एफआयआर दाखल; सुरक्षेत वाढ

0

नवी दिल्ली: काल प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठा हिंसाचार झाला. यात दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. या हिंसाचारावरून शेतकऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. शेतकरी आंदोलन करणाऱ्या नेत्यांकडून हिंसक घटनांचा निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान दिल्ली हिंसाचार प्रकरणात २२ एफआयआर दाखल करण्यात आले असून दिल्लीसह अनेक ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आले आहे.काल गृहमंत्रालयाची तातडीची बैठक झाली यात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारात २३० पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी केली जाणार आहे. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्याने वादं निर्माण झाला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

कालच्या दिल्लीतील हिंसाचारावरून सोशल मीडियात दोन मतप्रवाह समोर आले आहे. लाल किल्ल्यावर तिरंगा हटवून धर्मध्वज फडकवण्यात आल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. तर काही जण फोटो, व्हिडीओ शेअर करत लाल किल्ल्यावर तिरंगा तसाच फडकत असून त्याशेजारी धर्मध्वज फडकवला गेल्याचा दावा करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून आता आंदोलकांचा शोध घेतला जात आहे. लाल किल्ल्यावर धर्मध्वज फडकवणारी व्यक्ती पंजाबच्या तरण तारण जिल्ह्याची रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे.

Copy