बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव

अंतिम मंजुरीची प्रतीक्षा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे मात्र, त्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. कालच्याच दिवशी सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला होता. यानंतर महाराष्ट्राची भूमिका ठरेल, अशी अपेक्षा होती.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली असून, आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. त्यांची बैठक दोन दिवसांमध्ये होईल. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करू, असेही गायकवाड यांनी सांगितले. बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यास या निर्णयाचा 14 लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल.