पिस्तूल लावून आठ लाखांचा कापूस लुटला

0

चाळीसगाव – मराठवाड्यातील आंबेओहोळ (ता. गंगापूर जि. औरंगाबाद) येथील कापूस ट्रकमधून गुजरातकडे विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या ट्रकचालक व क्लिनरला सात ते आठ चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून ट्रकसह सुमारे 8 लाख 70 हजार रूपये किंमतीचा कापूस लुटून नेल्याची घटना धुळे-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोदगाव बायपासजवळ घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

भामट्यांनी कारमध्ये चालक, क्लिनरला फिरविले
भगवान दगडोबा गव्हाड (वय 34, रा चौधरी कॉलनी, चिकलठाणा, ता. जि.औरंगाबाद) हा मिठू माणिक साळुंखे यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये (एमएच 20 ईजी 7135) आंबेओहोळ येथील कापूस व्यापारी गणेश रावते यांचा 161 क्विंटल कापूस घेऊन औरंगाबादहून चाळीसगावमार्गे गुजरातमधील अंजारकडे (जि. भुज) जात होते. 18 मार्च रोजी रात्री सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते धुळे महामार्गावरील कोदगाव बायपासजवळ अज्ञात ओमनी कार कापसाच्या ट्रकला आडवी लावण्यात आली. कारमधील सात ते आठ जणांनी खाली उतरून ट्रकचालक गव्हाड व क्लिनर रिजवान सलीम शेख (रा. जिंतूर, परभणी) यांना पिस्तूलचा धाक दाखवून कारमध्ये बसविले. नंतर सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांना फिरविले आणि पुन्हा ट्रकजवळ आणून सोडून दिले. या दरम्यान, लुटारूंनी ट्रकमधील 8 लाख 70 हजार रुपयेे किंमतीचा 161 क्विंटल कापूस दुसर्‍या ट्रकमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली. ट्रकचालक भगवान गव्हाड यांच्या फिर्यादीवरून रात्री अज्ञात सात ते आठ चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy