जळगावात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’; आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली पहिली लस

0

जळगाव :शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयात कोरोना लसीकरणाचा “ड्राय रन” अर्थात मॉक ड्रिल कार्यक्रम आज शुक्रवारी ८ जानेवारी घेण्यात आला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते “ड्राय रन” च्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचारी मिलिंद निवृत्ती काळे यांना पहिली तर राकेश अरुण पाटील यांच्यावर दुसरी लसीकरणाची चाचणी करण्यात आली.

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी प्रतीक्षेत असलेली लस येत असल्याने दिलासा मिळाला आहे. लस घेतल्यानंतरदेखील कोरोना निर्मूलनाच्या “त्रिसूत्री”चे पालन करायचे आहे. लवकरच आपण या महामारीवर विजय मिळवूया, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

यावेळी प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. उत्तम तासखेडकर, नोडल अधिकारी डॉ. विलास मालकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ उपस्थित होते.

सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अधिकाऱ्यांनी “ड्राय रन” साठी केलेली तयारी दाखवली. ऑनलाईन नोंदणी, लसीकरणाची तयारी, प्रतीक्षा कक्ष अशी उभारलेली यंत्रणा पाहून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अधिपरिचारक संपत मल्हार यांनी त्यांची संगणकावर नोंद केल्यावर परिचारिका कुमुद जवंजाळ यांनी मिलिंद काळे व राकेश पाटील यांना प्रातिनिधिक लस टोचली. त्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी यांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले.

यावेळी पुढील १५ दिवसानंतर लस येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मिलिंद काळे व राकेश पाटील यांना पालकमंत्री पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नर्सिंग कॉलेज इमारतीची रचना पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच लसीकरणासाठी असलेले उत्तम नियोजनाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले. लसीकरणासाठी डॉ. योगिता बाविस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. संदीप सूर्यवंशी, अधिसेविका कविता नेतकर परिचारिका जयश्री वानखेडे, कर्मचारी अनिल बागलाणे आदींनी परिश्रम घेतले.

Copy