यांत्रिकी झाडू, खाजगीकरण व प्रलंबित मागण्यांसाठी आज सफाई कर्मचाऱ्यांचा मोर्चा 

0

मुंबई –   मुंबई पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यात यांत्रिक झाडू आणून कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचा डाव सुरु आहे. तसेच घन कचरा व्यवस्थापनातील परिवहन विभागाचे खाजगीकरण केले जात आहे या विरोधात सफाई व परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्याचा गुरुवार दिनाक ६ एप्रिल रोजी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष सुखदेव काशीद यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत काशीद बोलत होते. यावेळी त्यांच्यासह युनियनचे सरचिटणीस महाबळ शेट्टी, कार्याध्यक्ष वामन कविस्कर, अशोक जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुंबई महापालिकेने सफाई कामासाठी एरिया बेस पद्धत सुरु केली आहे. यात अर्धे काम कामगारांकडून तर अर्धे काम कंत्राटदारांकडून केले जाणार आहे. पालिकेकडून १ किलोमीटर रस्त्याला दोन सफाई कर्मचाऱ्यांना ४० हजार दरमहा वेतन दिले जाते. तर यांत्रिकी झाडूने सफाई केल्यास एका किलोमीटरला प्रतिदिन २७०० यूपये प्रमाणे महिन्याला ८१ हजार रुपये खर्च येतो. सफाई कर्मचारी जेवढे काम एका दिवसात करतात तितके काम यांत्रिकी झाडू करत नसले तरी कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी यांत्रिकी झाडू व एरिया बेस चा प्रयोग केला जात असल्याचा आरोप काशीद यांनी केला. महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागात ३१७६५ कर्मचारी तर दत्तकवस्ती, मॅनिंग मॉपिंग, हैदराबाद पॅटर्न, एनजीओचे १५०० कंत्राटी कामगार काम करत आहेत. प्रशासनाच्या कंत्राटीकरणामुळे या सर्व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या व त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सफाई खात्यात ४० हजार कर्मचारी कालबद्ध पदोन्नती पात्र असले तरी फक्त १० हजार ७४२ कर्मचारयांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आलेली आहे. सफाई विभागातील परिवहन विभागात ७८ टक्के खाजगीकरण करण्यात आले आहे. हजारो सफाई कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्यात आलेली नाही, हजारो वारसाहक्काची प्रकरणे प्रलंबित आहेत. हजारो विविध पदे रिक्त आहेत, कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा दिल्या जात नाहीत या विरोधात गुरुवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे काशीद यांनी संगीतले.