चोपडा शहरातून चक्क 1000 लीटर पाण्याची चोरी

0

चोपडा – दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचे मोलही आता इतके ‘अनमोल’ झाले आहे की, त्याकडे कमाईच्या बहाण्याने चोरट्यांची वक्रदृष्टी वळली आहे. चोपड्यात चक्क 1000 लीटर पाण्याची चोरी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे म्हटले जात आहे.
चोपड्यात नगरपालिकेचे पाणी 15 ते 20 दिवसांनी येते. त्यामुळे शहरवासियांनी पुढील किमान 15 दिवसांचे पाणी साठवून ठेवावे लागते. विवेकानंद शाळेतील शिक्षक राकेश विसपुते आणि त्यांची आई शशिकला विसपुते हे शहरातील बोरोलेनगर-2 मधील चारुशिला कॉलनी, ऋषिका पार्कमध्ये राहतात. त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर 2500 लीटर आणि अंगणात 1000 लीटर पाणी साठवण क्षमता केलेली आहे. काही दिवसांपूर्वी पाणी आल्यावर त्यांनी छतावरील आणि अंगणातील टाकी पाण्याने भरून घेतली होती. त्यानंतर विसपुते दररोज टाकीतील पाणी तपासायचे. ते रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत जागे होते. त्यानंतर सोमवारी सकाळी 11 वाजता पाणी वरच्या टाकीत चढविण्यासाठी गेले असता, अंगणातील टाकीतून पाणी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. टाकीतून पाणी चोरीला गेल्याबाबत त्यांनी शेजारी चौकशी केली असता, त्यांच्यापैकी एकानेही टाकीतून पाणी घेतले नसल्याचे विसपुते यांना सांगितले.

Copy