चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावले

0

नवी दिल्ली: चांद्रयान २ ने आता मंगळवारी रात्री २ वाजून २१ मिनिटांनी पृथ्वीला सोडत चंद्राच्या दिशेने आगेकूच केली आहे. अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. पृथ्वीची कक्षा सोडण्यापूर्वी इस्रोने ट्रान्स लूनार इंजेक्शन’ (टीएलआय) हा किचकट प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला. ‘चांद्रयान-२’चा चंद्राच्या बाह्य कक्षेत सहज प्रवेश व्हावा म्हणून यानातील लिक्विड इंजिन सुमारे १,२०३ सेकंदापर्यंत फायर केले गेले. या क्रियेनंतर तब्बल २२ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिलेल्या चांद्रयानानं चंद्राच्या हद्दीत प्रवेश केला.

पुढील सहा दिवस चांद्रयान आपला चंद्राच्या दिशेने प्रवेश सुरू ठेवणार असून ४.१ लाख किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. यानंतर २० ऑगस्ट रोजी चांद्रयान-२ हे चंद्राच्या कक्षेत पोहोचेल,अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी दिली. चंद्राच्या नजीक पोहोचल्यानंतर चांद्रयान २ चे प्रोपल्शन सिस्टम पुन्हा एकदा फायर करण्यात येणार आहे. यामुळे या यानाची गती कमी होईल. त्यामुळे हे यान चंद्राच्या प्राथमिक कक्षेत स्थिरावणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवर चांद्रयान दोन फेऱ्या मारेल. प्रोपल्शन सिस्टमच्या मदतीने चांद्रयान 2 ची कक्षा कमी केली जाणार असल्याची माहिती, सिवन यांनी दिली.

तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान २ मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान २ चा प्रयत्न असेल.

Copy