या पंतप्रधानांनी गुपचूप उरकले लग्न

लंडन – प्रेमाला मर्यादा नाहीत, वयाची बंधनेही नसतात. आता हेच पाहा नां, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपल्यापेक्षा 23 वर्षांहून लहान असलेल्या मैत्रिणीशी लग्न केले आहे. हा विवाहसोहळा खासगी पद्धतीने पार पडला. यावेळी दोघांचे जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता.

56 वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि त्यांची 33 वर्षीय गर्लफ्रेंड कैरी साइमंडस हे 30 जुलै 2022 रोजी करणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी ते नातेवाईकांना आमंत्रण देत होते. प्रत्यक्षात त्यांनी झटपट लग्न उरकून घेतले. त्यामुळे सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. 2019 मध्ये जॉनसन पंतप्रधान झाल्यानंतर जॉनसन आणि साइमंडस डाऊनिंग स्ट्रीटमध्ये एकत्र होते. गेल्यावर्षी त्यांना एक मुलगा झाला आहे. या अगोदर जॉनसन यांचं लग्न मरीना व्हीलरसोबत झाले होते. या दोघांना चार मुले आहेत. 25 वर्षांच्या संसारानंतर सप्टेंबर 2018 साली हे दोघे वेगळे झाले. व्हीलरच्या अगोदर जॉनसन यांनी एलेग्रा मोस्टिन-ओवेनसोबत लग्न केले होते. साइमंड्स जॉनसन यांची तिसरी पत्नी आहे.