BREAKING: जिल्ह्यात सामान्यांसाठी पेट्रोलपंप बंद; फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच इंधन पुरवठा

0

जळगाव: जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीही पेट्रोल घेण्याच्या बहाण्याने गर्दी होतच आहे. त्यामुळे आता शेवटी पेट्रोल पंपावर निर्बंध घालण्यात आले आहे. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल-डीझेल उपलब्ध असणार आहे. त्यासाठीची वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. महापालिका व जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व शहराच्या तीन किलोमीटर परिसरातील सर्व पेट्रोल-डीझेल पंप ३१ मार्चपर्यंत सकाळी ७ ते १० आणि दुपारी ४ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. मात्र ग्रामीण भागातील पेट्रोलपंपावर पेट्रोल सर्वांसाठी खुले आहे.

यांनाच मिळणार पेट्रोल-डीझेल
सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, कर्तव्यावर असलेली वाहने, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणारी वाहने, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी डॉक्टर आणि नर्सेस, वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक, प्रसार माध्यमांची वाहने व प्रतिनिधींची वाहने, वृत्तपत्र विक्रेते व वितरणाशी संबंधित यंत्रणा, गणवेशधारी पोलीस अधिकारी, कर्मचारी, घंटागाड्या, पाणीपुरवठा करणारी वाहने, एनजीओ, अन्न-भाजीपाला, फळे, दुध पुरवठा करणारी वाहने यांनाच पेट्रोल-डीझेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पेट्रोलपंप चालकांना विक्रीची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Copy