BREAKING: आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार पहिला सामना

0

नवी दिल्ली : ‘इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वाचे वेळापत्रक आज रविवारी ६ रोजी जाहीर झाले. कोरोनामुळे यावर्षीचे आयपीएल होणार की नाही? याबाबत साशंकता होती, मात्र आयपीएल होणार असून ते यूएईत होणार आहे. आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या सत्राला सुरुवात होणार आहे. पहिला सामना अबूधाबी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. बीसीसीआयने ही घोषणा केली. यंदाच्या आयपीएलचे स्पॉन्सर ड्रीम ११ कडे आहे.

कोरोनामुळे आठही संघांच्या समस्यात भर पडल्यामुळे चाहत्यांना वेळापत्रकाची उत्सुकता होती. दुबई, अबूधाबी आणि शारजा येथे सामने होणार आहेत. सर्व संघ स्पर्धास्थळी दाखल झाले असून नियमावलीनुसार विलगीकरण कालावधी पूर्ण करीत सरावाला लागले आहेत.

चेन्नई सुपरकिंग्सने कोरोनाच्या तीन चाचण्यांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी सराव सुरू केला. या संघातील दोन खेळाडूंसह १३ सदस्य पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली होती. त्या सर्वांना संघापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. दरम्यान सुरेश रैना आणि हरभजनसिंग या दोन अनुभवी खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे सीएसकेला पाठोपाठ धक्के बसले. या आधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेळापत्रक ४ सप्टेबर रोजी जाहीर होणार होते.