शिवसेना प्रवेशासाठी आणखीही नगरसेवकांच्या नावांची चर्चा

जळगाव – शिवसेना सध्या जळगाव महापालिकेत एकदम फॉर्मात आहे. या पक्षाने आतापर्यंत भाजपाचे एकूण 30 नगरसेवक दोन टप्प्यात फोडले असून, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हातून शिवबंधन बांधून घेतले आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता शिवसेना अजून एक तिसरा धक्का भाजपाला देण्याच्या तयारीत आहे. भाजपामधील आणखी 9 ते 12 नगरसेवक फुटून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

याआधी भाजपाचे 27 नगरसेवक शिवसेनेत गेले, त्यानंतर कालच्या दिवशी शनिवारी सुरेश सोनवणे, शोभा बारी, शेख हसिना शेख शरीफ या नगरसेवकांनीही शिवबंधन बांधून घेतले. त्यामुळे भाजपाला सोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांची एकूण संख्या 30 झाली आहे. भाजपाचे 57 नगरसेवक महापालिकेत निवडून आले होते. सध्या पक्षाकडे 27 नगरसेवक बाकी आहे. त्यांच्यातील आणखी 9 ते 12 नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. भाजपाचा एखादा बडा नगरसेवक गळाला लावण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न चालले आहेत. अन्य एका माहितीनुसार, भाजपाचे आणखी नऊ नगरसेवक जर शिवसेनेत आले तर भाजपातून फुटलेल्या नगरसेवकांची एकूण संख्या 39 होईल. त्यामुळे त्यांना गट स्थापन करणे सोयीचे होईल, त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळेल.

विकासकामे होत नसल्याने भाजपातील नगरसेवक नाराज

गेल्या अडीच वर्षात जळगाव शहरात विकासकामे झालेली नाहीत, तर पुढील अडीच वर्षांनंतर नगरसेवकांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यावेळी जनतेच्या प्रश्‍नांना काय उत्तरे द्यायची ? या विवंचनेत असलेले भाजपातील नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांना जनतेला कामे करून दाखवायची आहेत आणि शिवसेनेची बांधिलकी ही जळगाव शहराच्या विकासाशी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते नितीन लढ्ढा यांनी दिली.