Private Advt

‘ब्लॅक मंडे’

ओमियोक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेली अस्थिरता आणि पुन्हा लॉकडाऊनचे संकट अशा दुहेरी भीतीमुळे गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. याची झलक गेल्या आठवड्यात शेअरबाजारावर स्पष्टपणे दिसून आली. भारतासह जगभरात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाच दुसर्‍या बाजूला केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढ करण्याचे धाडसी निर्णय घेतले. यामुळे द्विधा मनस्थिती झालेल्या गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला. परिणामी सोमवार हा गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. आधीच देशाची अर्थव्यवस्था अनिश्‍चितेच्या हिंदोळ्यांवर हेलकावे खात असतांना आता आर्थिक भूकंपांचे झटके बसत आहेत. यामुळे सर्वसमान्य गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले आहेत.
गेल्या वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात संपूर्ण जग भरडले जात आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. औद्योगिक क्षेत्र तर पार कोलमडून पडले आहे. परिणामी सर्वंच देशांची अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात आहे. जगभरात मंदींचे वादळ घोंगावत आहे. साधारणत: अशी परिस्थिती आली तर त्याचे विपरित परिणाम शेअर बाजारावर होतात. 2008 साली एकट्या लेहमन ब्रदर्समुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. मात्र यंदा शेअर बाजाराने सर्व तज्ञ व विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत आपली घोडदौड सुरुच ठेवली होती. शेअर बाजाराने गाठलेला हा उच्चांक म्हणजे एक कृत्रिम फुगवटा असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. विश्लेषकांची ही भीती खरी तर नाही ना? यावर पुन्हा एकदा चर्चा सरु झाली आहे. कारण गेल्या आठवडाभरापासून शेअर बाजारात घसरण सुरु झाली आहे. भांडवली बाजाराला सोमवारी पुन्हा एकदा कोरोनाचा तडाखा बसल्याचे दिसून आले. ओमिक्रॉनचा फैलाव आणि पुन्हा लॉकडाऊनचे संकट याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्याने सोमवारी सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 300 अंकांनी आपटला. या पडझडीने काही मिनिटांत तीन लाख कोटींचा चुराडा झाला. सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्समध्ये घसरणी दिसून आली. आधीच आठवडाभर झालेल्या प्रचंड घसरणीने गुंतवणूकदार होरपळून निघाले आहेत. ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्बंधांचे संकट बड्या देशांवर घोंघावत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढीचे संकेत दिल्याने परदेशी गुंतणूकदारांनी उदयोन्मुख बाजारपेठांतून अंग काढून घेतले आहे. परिणामी भारतीय बाजारात देखील मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. मागील दोन महिन्यात निर्देशांकांमध्ये झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांचे किमान 15 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. बाजारातील अनिश्चितता आणखी काही काळ राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने गुंतवणुकदारांनी सावधरित्या व्यवहार कारणे गरजेचे आहे. वाढती महागाई, ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या, विकसित अर्थव्यवस्थांमधील वाढीचा वेग मंदावणे आदी कारणांमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. सध्या अनेक नकारात्मक घडामोडी बाजारावर परिणाम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनच्या माध्यमातून पसरेल, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. तर जगभरातील प्रमुख देशांच्या केंद्रीय बँकांनी पतधोरण कठोर करण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी बँक ऑफ इंग्लडने नुकताच व्याजदर वाढवले होते. तर बँक ऑफ जपानने करोना संकटात अर्थव्यवस्थेसाठी सुरु केलेल्या प्रोत्साहन पॅकेजला कात्री लावली होती. त्याचवेळी भारतीय स्पर्धा आयोगाने अ‍ॅमेझॉनचे 2019 मध्ये फ्युचर ग्रुपशी केलेला करार रद्द केला आहे. तसेच आयोगाला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी चुकीची माहिती सादर केल्याबाबत अ‍ॅमेझॉनला 200 कोटींचा दंड ठोठावला. याचेही पडसाद आज भांडवली बाजारात उमटले. एकाबाजूला अर्थव्यवस्थेची नकारात्मकता दिसत असली तरी नोव्हेंबरमध्ये झालेले जीएसटीचे संकलन एक लाख चार हजार कोटी रुपयांवर, तर डिसेंबरात ते एक लाख 15 हजार कोटींपर्यंत पोहचले. थंड पडलेली अर्थव्यवस्था पुन्हा हलू लागल्याचे लक्षण म्हणता येईल. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये जमा करण्यात आलेल्या आगाऊ कराच्या रकमेमध्ये गतवर्षाच्या तुलनेत 53.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. अद्यापही काही बँकांची आकडेवारी मिळणे बाकी असल्याने या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता अर्थमंत्रालयातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीसाठी आगाऊ कर जमा करण्याची मुदत 15 डिसेंबर असते. या तारखेपर्यंत यंदा 4,59,917.1 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये जमा करण्यात आलेल्या आगाऊ कराची रक्कम 2,99,620.5 कोटी रुपयांचा होता. याचाच अर्थ चालू वर्षामध्ये आगाऊ कराचा भरणा 53.5 टक्क्यांनी जास्त झाला आहे. यामध्ये 3.49 लाख कोटी रुपयांचा कंपनी कर तर 1.11 लाख कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर असल्याचेही मंत्रालयाने जाहीर केले आहे. यासह मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत दिसत असलेला उत्साह, शेअर बाजारातील तेजीचे वारे, यामुळे अर्थकारणाच्या बाबतीत उत्साहाचे वातावरण आहे. मागील दीड वर्षांपासून घट्ट झालेला कोरोनाचा विळखा सैल होत असल्याने देशाची अर्थव्यवस्थाही रुळावर येवू लागली आहे. याबाबत बोलतांना भारतीय अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येईल, असे भाकित अनेक वित्तीय संस्थानी वर्तविले होते. मात्र आता शेअर बाजारात पडझड होत आहे, या दोन्ही परस्पर विरोधी बाबी आहेत. मुळात सध्या बाजारातील पडझड ही मुख्यत्वे करुन युरोप मधील घडामोंडींमुळेच होत आहे. यामुळे ही अल्पकालीन बाब असेल, असे दिसते. मात्र गुंतवणुकदारांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 

डॉ युवराज परदेशी

निवासी संपादक , जनशक्ती