भाजपच्या मिशन 2019 ला सुरुवात

0

नवी दिल्ली। उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत मोठे यश मिळवल्यावर आता भाजपने मिशन 2019 चा शुभारंभ केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजप 6 ते 14 एप्रिल दरम्यान 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला त्या ठिकाणी मंत्री आणि जेष्ठ पदाधिकार्‍यांना पाहाणी दौर्‍यावर पाठवणार आहे. या मिशनचे वेळापत्रक अगदी पद्धतशिरपणे आखण्यात आले आहे. 6 एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे आणि 14 एप्रिल रोजी आंबेडकरांची जयंती असते. या दौर्‍या दरम्यान भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी केंद्र सरकारने सुरू केलेल्या उज्ज्वल योजना, स्किल इंडिया, जीएसटी आणि इतर योजनांची माहिती सर्वसामन्य नागरिकांना देणार आहेत. सहा दिवस चालणार्‍या या मिशन 2019 मध्ये भाजपचे अनेक मंत्री आणि खासदार सहभागी होतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हैदराबादला जाणार आहेत. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या दक्षिण कोलकाता भागाचा दौरा खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग करणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदार संघात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा त्रिशूरमध्ये आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदार संघात वी. के. सिंग जातील.

वर्धापन दिनाचा मुहूर्त
भाजपचे महासचिव अनिल जैन यांना त्यांचे निवासस्थान असलेल्या फिरोजाबादमध्ये राहण्यास सांगितले आहे. राम कृपाल यादव यांना मैनपुरी मतदार संघात पाठवले आहे. फिरोजाबाद आणि मैनपुरी हे दोन्ही समजावादी पार्टीचे बालेकिल्ले समजले जातात. पक्शाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून अमित शहा यांनी पक्षाला अनेक राज्यांमध्ये यश मिळवून दिले आहे. त्यात ओडिशा, पश्‍चिम बंगाल, केरळ आणि उत्तर पूर्व भागातील राज्यांचा समावेश आहे. आता या राज्यांमध्ये लोकसभेच्या जास्त जागा जिंकण्याच्या तयारीला भाजपने सुरुवात केली आहे.

नवीन जागांवर लक्ष केंद्रित करणार
मिशन 2019 साठी भाजपने विजय मिळू शकणार्‍या जागांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखली. सुमारे 20 वर्षानंतर भाजपने ओडिशामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यामागे तेच कारण आहे. ओडिशात झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजपने ओडिशाची निवड केली. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन 2019 चा आराखडा तयार केला आहे. नरेंद्र मोदींनी एक मोठी यादी तयार केली असून त्यात पक्षाच्या खासदारांनी काय करायचे? याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पंतप्रधानांनी मागील 15 दिवसांमध्ये प्रत्येक राज्यातल्या भाजपच्या खासदारांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांना सोशल मीडियाचा जास्तित जास्त वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत.