ब्रेकिंग : विधान परिषद निवडणुकीत झालेत गैरव्यवहार

0

मुंबई – भाजपाचे (bjp) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाले असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ते बुधवारी, मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व प्रदेश माध्यमविभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद (vidhan parishad) निवडणुकीत शेवटच्या तासात संशयास्पद रितीने मतदान वाढणे, पदवीधर नसलेल्यांची नावे मतदार यादीत असणे, खूप मोठ्या प्रमाणात कोर्‍या मतपत्रिका आढळणे असे अनेक गैरव्यवहार झाल्याचे आढळले आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येणार असून, हायकोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. ते पुढे म्हणाले की, पक्षाचे 28 नेते आगामी तीन दिवसात राज्यभर प्रवास करणार आहेत. राज्यातील 14,500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आढावा घेऊन निवडणूक लढवत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पक्षातर्फे मदत करण्याची योजना हे नेते निश्चित करतील. राज्यात लवकरच होणार्‍या 92 नगरपालिका – नगरपंचायती व 5 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा विचार पक्षाच्या बैठकीत करण्यात आला आहे.

मंदिर निर्मितीसाठी दहा दहा रुपये गोळा करणार

अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणार्‍या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार असून पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन लोकांकडून मंदिरासाठी निधी गोळा करतील, अशी माहितीही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथील भव्य मंदिरात आपला वाटा असावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने नागरिकांकडून निधी संकलन करण्यात येणार आहे. भाजपा निधी संकलनासाठी सक्रीय मदत करणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मंदिर निर्मितीसाठी दहा दहा रुपये गोळा करतील. त्यासाठी बूथ पातळीपासून सर्वांची योजना पक्षाच्या मुंबईतील बैठकीत निश्चित करण्यात आली, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Copy