जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप

0

शिरपूर: तालुक्यातील कॉंग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपा पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत शिरपूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश करून आ.अमरिशभाई पटेल यांच्या प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील अमरिशभाई पटेल यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे जुने व सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.

सोमवारी, 30 सप्टेंबर रोजी मुंबईतील गरवारे क्लब येथे झालेल्या भाजपा मेगा भरती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिरपूर तालुक्याचे काँग्रेसचे आ.काशीराम पावरा व तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला. शिरपूर शहरासहित ग्रामीण भागातील काशीराम पावरा व प्रभाकर चव्हाण यांचे समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी भाजपचे एकही स्थानिक नेते किंवा कार्यकर्ते जल्लोषात दिसून येत नसल्याचे दिसून येत आहेत. मुंबईतील प्रवेश सोहळावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिरपूर तालुक्यातील काँग्रेसचे आ. काशीराम पावरा आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी भाजपा पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. लवकरच शिरपूर तालुक्याचे वरिष्ठ नेते अमरिशभाई पटेल यांचाही भाजपात प्रवेश होईल. संपूर्ण शिरपूर तालुका हा भाजपमय होणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या भाजपच्या मेगा भरती कार्यक्रमावेळी संकेत दिले आहेत. त्यामुळे तालुकाच्या राजकारणासहित जिल्हास्तरावर मोठा भूकंप होण्याचा होणार असा अंदाज मतदारांना भासू लागला आहे. आता पुढील एक-दोन दिवसात भाजपाचे गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभागी व तळागाळातील नागरिकांशी सतत संपर्क साधून असलेल्या डॉ.जितेंद्र ठाकूर काय भूमिका घेतात, त्याची नागरिकांमध्ये जोरदार उत्सुकता निर्माण झाली आहे.