भुसावळ बाजार पेठ पोलीस चौकीला विक्रेत्यांचा गराडा

भुरट्या चोरट्यांना झाले मोकळे रान - पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता 

भुसावळ । प्रतिनिधी

भुसावळ बसस्थानक लगतच्या नगर परिषदेच्या इमारतीला लागून बाजार पेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी उभारण्यात आली आहे . मात्र,या पोलीस चौकीत सद्यस्थितीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ही पोलीस विक्रेत्याच्या गराड्यात सापडली असून भुरट्या चोरट्यांनाही मोकळे रान झाले आहे . यामुळे पोलीस चौकी या गराड्यातुन मुक्त करावी अशी मागणी बीआरएसपीचे तालुकाध्यक्ष राजु सावळे यांनी मागणी केली आहे .

भुसावळ शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच या परिसरातील किरकोळ वादाच्या घटनांवर नियत्रंणासाठी बाजार पेठ पोलीस ठाणे अंतर्गत नगर परिषद इमारतीला लागून पोलीस चौकी उभारण्यात आली आहे . या पोलीस चौकीत दैनंदिन दोन पोलीस कर्मचारी तसेच वाहतुक शाखेच्या पोलीसांची नियुक्ती केली जाते . मात्र, गत काही काही वर्षापासून या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने हि पोलीस चौकी बंदावस्थेत पडली आहे . याचा फायदा घेत काही फळ विक्रेते व इतर साहीत्य विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाकरीता या पोलीस चौकी लगतच आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे . यामुळे या पोलीस चौकीला किरकोळ विक्रेत्यांचा गराडा पडला असल्याने पोलीस चौकी दिसेनाशी झाली आहे . यामुळे पोलीस प्रशासनाच्या या दुर्लक्षीत कारभाराचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

तक्रारदारांना गाठावे लागते बाजारपेठ पोलीस ठाणे

भुसावळ शहर रेल्वेचे जंक्शन स्थानक व लगतच बसस्थानक असल्याने या परिसरात रात्र – दिवस प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते . याची संधी साधून काही खिसे कापू व भुरट्या चोरट्यांचाही या परिसरात राबता असतो . तसेच काही किरकोळ स्वरुपाच्या वादाच्या घटना या परिसरात नित्याच्याच झाल्या असुन अशा घटनांचा निपटारा अथवा गुन्हेगाराला त्वरीत जेरबंद करण्यासाठी या पोलीस चौकीची निर्मीती करण्यात आली आहे . यामुळे परिसरात घडलेल्या घटनेतील तक्रारदारांना या पोलीस चौकीमुळे दिलासा मिळत होता . मात्र, हि पोलीस चौकी बंदावस्थेत राहत असल्याने पिडीतांना तक्रारीसाठी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठावे लागते . यामुळे हि पोलीस चौकी विक्रेत्यांच्या गराड्यातुन मुक्त करून पुर्ववत सुरु करावी अशी मागणी बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीचे तालुकाध्यक्ष राजु सावळे यांनी केली आहे .