भोजपूरी अभिनेता रवी किशनला दीड कोटीत गंडविले !

0

मुंबई – भोजपूरी अभिनेता रवी किशन याला मुंबईतील जुहू परिसरात फ्लॅट देतो असे सांगत तीन दलालांनी दीड कोटी रुपयात फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत रवी किशन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.

मुंबईत अनेक दिग्ग्ज अभिनेत्यांसह अभिनेत्रीची घरे जुहू परिसरात आहेत. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येकाचे अशा दिग्गजांच्या परिसरात आपलेही घर असावे असे वाटत असते. त्याचप्रमाणे भोजपूरी सुपरस्टार अभिनेता रवी किशन याला जुहू परिसरात फ्लॅट पाहिजे होता. तो फ्लॅट मिळवून देतो अशी बतावणी करून तीन दलालांनी दीड कोटीं रवी किशन यांच्याकडून घेऊन गंडा घातला आहे. याप्रकरणी रवी किशन यांनी पोलिसात तक्रार केली आहे.

रवी किशन यांनी जुहू हाय राईझ सोसायटीत फ्लॅट मिळविण्यासाठी कमला लॅण्ड मार्क ग्रुपचे जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यासोबत व्यवहार केला होता. पैसे घेऊनही फ्लॅट देत नसल्याने रवी किशन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. कमला लॅण्ड मार्क ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित रिअर इस्टेट कंपन्यांनी याअगोदर वर्सोवातील एक व्यावसायिक सुनील नायर यांची देखील साडे सहा कोटींची फसवणूक केली आहे. पोलिसांनी नायर व रवी किशनची तक्रार एकत्र करून कमला लॅण्ड मार्क ग्रुपच्या जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नायर प्रकरणी पोलिसांनी या तिघांना नोव्हेंबर २०१६ मध्ये अटक केली असून तेव्हापासून ते तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Copy