खान्देशचा सांस्कृतिक मानदंड ठरलेला बालगंधर्व संगीत महोत्सव

0

नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व संगीत मराठी रंगभमीला पडलेले balgandharva एक स्वप्न. बालगंधर्व जाउन मोठा काळ लोटल असला तरी या नावाची मोहिनी कमी झालेली नाही. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक ठिकाणी नाटयगृह उभारली गेली असली तरी त्यांच्या नावाने संगीत महोत्सव सुरू करणारे देशातील एकमेव शहर म्हणजे जळगाव. बालगंधर्वांचे बालपण, प्राथमिक शिक्षण जळगाव शहरात गेल्याने या शहराला बालगंधर्वांबद्दल आदर आहे. या आदरातूनच बालगंधर्वांच्या नावाने संपूर्ण भारतात एकमेव असा संगीत महोत्सव जळगाव शहरात आयोजित केला जातो. गेले अठरावर्ष हा महोत्सव आयोजित होत असून यंदा हे 19 वे वर्ष आहे. जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानच्यावतीने या संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते.

– विजय पाठक, जळगाव 9373367374

2003 मध्ये पहिला बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन झाले. करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटनाने प्रारंभ झाला. पहिल्याच महोत्सवाला विजय कोपरकर, देवकी पंडित, जयतीर्थ मेहुंडी, पं. संजीव अभ्यंकर यांचे शास्त्रीय गायन, उस्ताद परवेझ यांचे सतार वादन, पं. ब्रिजनारायण यांचे सरोदवादन, कावेरी आगाशे, मानसी तापीकर यांचे कथ्थकाने या पहिल्या महोत्सवात रंग भरला. या महोत्सवाला जळगावातूनच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून संगीतप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने प्रतिष्ठानचा उत्साह वाढला तर रसिकांच्या प्रतिष्ठान बदृलच्या अपेक्षा वाढल्या. गायन वादन आणि नृत्य याला वाहिलेल्या या दुसर्‍या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा प्रारंभ पं. शैलेश भागवत यांच्या सनई वादनाने झाला. आरती अंकलेकर- टिकेकर, वीणा सहस्त्रबुध्दे, पं. राम मराठे यांच्या गायनाने रसिक तृप्त झाले. शर्वरी जमेनिस, ऋतुजा सोमण यांचे कथ्थक, पं. धृवघोष यांचे सारंगीवादन आणि अरविंदकुमार आझाद यांचे सोलो तबला वादन, रसिकांना सुखावून गेले. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन हा या महोत्सवातील परमोच्च बिंदू ठरला. यानंतर संगीत महोत्सवातील कलावंतांविषयी उत्सुकता आणि अपेक्षा रसिकात वाढत गेली. प्रतिष्ठानने देखील रसिकांना मान राखत अपेक्षाभंग होऊ दिला नाही. पंडिता आशा खाडीलकर, उदय भवाळकर, राजश्री पाठक, पं. रतन मोहन शर्मा, कल्पना झाकोरकर, विजय कोपरकर, उस्ताद रशिदखान, कौशिकी चक्रवर्ती, राहुल देशपांडे, शुभा मुदगल, पं. जसराज, राजन साजन मिश्रा, आनंद भाटे, आनंद गंधर्व यांचे गायन, पं शिवकुमार शर्मा संतुरवादन, रोणु मुझुमदार (बासरी वादन), भवानी शंकर (पखवाज), संदीप घोष (तबला), रिंपा शिव (तबला), ओजस आदिया (तबला), पूर्वायन चटर्जी (सतार), विश्वमोहन भट (वीणा वादन) यांनी जसे आपल्या वादनाने थक्क केले, तसेच सुचेता भिडे चापेकर यांचे भरत नाट्यम, पं. दीपक महाराज, अर्जून मिश्रा, शमा भाटे, अर्चना जोगळेकर यांचे कथ्थक सुखावून गेले. अमजदअली खान यांचे सरोदवादन लक्षात राहिले. गेल्या सतरा वर्षातील ही काही वेचक कलावंतांची नावे. अनेकअनेक कलावंत हे तरूण कलावंत म्हणून येऊन गेले. आज देशभर गाजत आहेत. त्यात कौशिकी चक्रवर्ती हे एक नाव. नामवंत कलावंताबरोबर तरूण कलावंतांना देखील मंच मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानने गेले चार वर्ष युवा कलांतांना या महोत्सवात जाणीवपूर्वक स्थान दिले. पूजा गायतोंडे, अंजली – नंदिनी गायकवाड, अमीरा पाटणकर, प्रकृती- संस्कृती वहाने ही काही वानगीदाखल उदाहरणे आहेत. युवा कलाकारांना संधी देत असतांना संगीत महोत्सवाच्या दर्जाला कुठेही धक्का लागू दिला नाही. हे देखील सांगितले पाहिजे.

आज पुण्यात होत असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात युवा कलाकारांना देखील स्थान दिले जात आहे. पुणेकरांनी ते मान्य केले आहे. हे लक्षात घेता जळगावकर कुठेही मागे नाहीत हे लक्षात येते. यंदा महोत्सवात तरूण कलावंतांना संधी देण्यात येणार असून, या महोत्सवाचा प्रारंभ आज दि 1 जानेवारीला शरयु दाते हिच्या गायनने होणार आहे. दुसर्‍या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत अश्विन श्रीनिवासन यांचे बासरीवादन होईल. त्यांना तबल्याची साथ ओजस अढिया आणि गिटारची साथ कलकत्याचे संजोय दार करतील. दि 2 जानेवारी रोजी, पहिल्या सत्रात संगीत रिसर्च अकादमीचे गुरू ओेंकार दादरकर यांचे शास्त्रीय गायन होईल तर दुसर्‍या सत्रात प्रख्यात नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी व सहकारी हे कथ्थक नृत्याच्या माध्यमातून बॉलीवूड फूट प्रिंटस हा नृत्याविष्कार सादर करतील. दि. 3 जानेवारीला प्रथम सत्रात ओरिसा येथील गोटीपुवा या लोकनृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे. या नृत्यप्रकारावरूनच ओडिसी नृत्याची निर्मिती झाली. या सादरीकरणात भुवनेश्वर येथील प्रख्यात नृत्यांगना सुश्री मोहंती यांचे ओडिसी नृत्य सादर होईल. या महोत्सवाचा समारोप अनोख्या अविष्काराने होत आहे. मराठी संगीताचा 1910 ते 1960 ही पाच दशके हा सुवर्ण काळ होता. या सुवर्णकाळाचा वेध घेणारा संगीत नाट्यानुभव आम्ही दुनियेचे राजे हा कार्यक्रम. या कार्यक्रमात दिग्गज संगीत दिग्दर्शकांची गाणी सुश्राव्य पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेलेला आहे. संगीत दिग्दर्शक देवेंद्र भोमे यांनी या कार्यक्रमाचे लेखन दिग्दर्शन व संगीत नियोजन केले असून, गौतमी देशपांडे व अभिजित खांडकेकर या अभिनेत्यांचे सूत्रसंचालन असणार आहे. उत्तमोत्तम कलावंतांच्या बालगंधर्व संगीत महोत्सवातील उपस्थितीमुळे या महोत्सवाची सांस्कृतिक उंची वाढली आहेच पण तो उत्तर महाराष्ट्रात रसिकमान्य झाला आहे. कलावंतांची अचूक निवड आणि नेटके नियोजन यातच या महोत्सवाचे यश दडले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त अशोक जैन, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर, प्रा.शरदचंद्र छापेकर रमेशदादा जैन, अरविंद देशपांडे, डॉ. अपर्णा भट, निनाद चांदोरकर आणि प्रतिष्ठानची तरूण पिढी यांचे परिश्रम या महोत्सवाचा आनंद वाढवण्यात आहे याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे.

 

Copy