बालगंधर्व संगीत महोत्सव घेण्यामागील हे कारण माहित आहे का?

0

चिन्मय जगताप (जळगाव) बालगंधर्वांच्या (balgandharv) नावाने संपूर्ण भारतात एकमेव असा संगीत महोत्सव जळगाव शहरात आयोजित केला जातो. गेले 18 वर्ष हा महोत्सव आयोजित होत असून, यंदा हे 19 वे वर्ष आहे. जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानच्यावतीने या संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. 2003 मध्ये पहिला बालगंधर्व संगीत महोत्सव झाला होता. शास्त्रीय संगीत जतन करण्यासह त्याकडे तरुणाईला आकर्षित करणे हाच उद्देश या महोत्सवाच्या आयोजनामागे असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चांदोरकर यांनी सांगितले. बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या आयोजनात कोणती आणि कशी आव्हाने आली यासंदर्भात जनशक्तीने दीपक चांदोरकर यांच्याशी संवाद साधला.

चांदोरकर म्हणाले की, जळगाव (jalgaon) सारख्या छोट्या शहरात अशा तर्‍हेचा संगीत महोत्सव आयोजित करणे सोपे काम नव्हते. यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पैसा आहे. मोठ्या कष्टाने आम्ही हा पैसा उभा केला. बालगंधर्व महोत्सव आधी जेथे व्हायचा तिथे सध्या सोयीसुविधाही नव्हत्या. हे आव्हान पेलत आम्ही हा महोत्सव घेत आलो आहोत. दरवर्षी जून महिन्यात महोत्सवाच्या नियोजनावेळी माझ्या समोर एक मोठ्ठा शून्य असतो. शून्य यासाठीच की, दरवर्षी महोत्सवासाठी आमच्याकडे किती भांडवल येणार आहे, ते कसे उभे राहणार आहे, येणारे कलावंत कोण असणार आहेत आणि ते किती मानधन घेणार आहेत हे मला माहित नसते. यामुळे दरवर्षी भांडवल उभे करणे आणि आणि त्याचा योग्य विनियोग करणे हे एक मोेठे आव्हान असते. शास्त्रीय संगीताला 5000 वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. सामवेदापासून याचा इतिहास आहे आणि हीच संस्कृती तरुणापर्यंत पोहोचवत ती जतन करणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. यासाठी जास्तीत जास्त युवा कलाकारांना आम्ही या महोत्सवात बोलवत असतो. याच बरोबर आम्ही तालवाद्यकचेरीचा प्रयोग करतो. म्हणजेच आम्ही फ्यूजन संगीताला प्राधान्य देतो, असेही चांदोरकर यांनी सांगितले.

Copy