स्वतंत्र बोगी देऊन अप-डाऊनची समस्या सोडवावी

0

जळगाव – रेल्वेने दररोज अप-डाऊन करणार्‍या नोकरदार प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दोन स्वतंत्र बोगी जोडून त्यांची प्रवासाची समस्या सोडवावी, अशी मागणी मध्य रेल्वे उपभोगकर्ता परामर्श समितीचे सदस्य चंद्रकांत कासार यांनी केली आहे. समिती सदस्यांची बैठक नुकतीच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम विवेक गुप्ता यांच्यासोबत झाली. प्रवाशांच्या विविध समस्यांवर, मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. संदीप कासार यांनी अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांसाठी एक्स्प्रेस व मेल गाड्यांना स्वतंत्र दोन बोगी लावण्यात याव्यात, अशी मागणी केली. या प्रवाशांना जनरल बोगीत जागा मिळत नाही, आरक्षित बोगीत प्रवास केल्यास दंड होण्याची भीती असते. त्यामुळे या प्रवाशांनी जायचे कुठे, प्रवास कसा करायचा ? असा प्रश्‍नही कासार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारी उधना-पाळधी मेमू ही गाडी भुसावळपर्यंत वाढवावी. सद्यस्थितीत अनेक प्रवाशांना पाळधीला उतरून जळगाव, भुसावळपर्यंत ऑटोरिक्षा व बसने प्रवास करावा लागतो. या गाडीचा मार्ग वाढवल्यास या प्रवाशांची समस्या सुटून रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल याकडेही चंद्रकांत कासार यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.

 

लोकलप्रमाणेच भुसावळ-मनमाड गाडी सुरू करा
भुसावळ ते मनमाड आणि मनमाड ते भुसावळ स्वतंत्र गाडी चालू करावी. यामुळे अप-डाऊन करणारे तसेच खान्देशवासियांना याच लाभ मिळेल. भुसावळ ते मनमाड मार्गावर लोकलच्या धर्तीवर गाडी चालू करावी. भविष्यात वाढती प्रवासी संख्या आणि सुटसुटीत व सुराशित प्रवास यासाठी अशी गाडी सुरू होणे आवश्यक आहे. अश्या प्रकारच्या गाड्या सुरू केल्याने अन्य लांब अंतराच्या गाड्यांवरील ताण कमी होईल याकडेही चंद्रकांत कासार यांनी लक्ष वेधले आहे.

Copy