विराट, अश्विनला मागे टाकत रवींद्र जडेजा ‘सर’!

0

नवी दिल्ली । 2016-17 या मोसमातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू म्हणून रवींद्र जडेजाची निवड झाली आहे. ईएसपीएनक्रिकइन्फो या संकेतस्थळाने सर्वोत्कृष्ट खेळाडूची निवड करताना वाचकांची मते मागवली होती. त्याने या पोलमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला मागे टाकत जाडेजाने सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळाच्यातज्ज्ञांच्या पॅनलकडूनही रवींद्र जडेजाची मोसमातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. या विशेष पॅनलमध्ये माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर, अजित आगरकर आणि आकाश चोप्रा यांचा समावेश होता.

सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू हसीब हमीद
सप्टेंबर 2016 ते मार्च 2017 या कालावधीत मायदेशात झालेल्या 13 कसोटी सामन्यांमध्ये जाडेजाने जबरदस्त कामगिरी केली. या 13 कसोटींमध्ये जाडेजाने 22.3 च्या सरासरीने गोलंदाजी केली, तर फलंदाजीतील जाडेजाची सरासरी 42.76 इतकी होती. इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळावर सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू निवडण्यासाठी 20,500 जणांनी मत नोंदवले. यातील 65 टक्के मत एकट्या जडेजाला मिळाली. यासोबतच तज्ज्ञांच्या पॅनलमधील 10 पैकी 6 जणांनी जडेजाला पसंती दिली. एकूण 20,500 मतांपैकी चेतेश्वर पुजाराला 12 टक्के मते मिळाली, तर तज्ज्ञांच्या पॅनलमधील दोन जणांनी पुजाराला पसंती दिली. अश्विन आणि कोहलीला प्रत्येकी एका सदस्याने पसंती दर्शवली. मोसमातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून हसीब हमीदची निवड करण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगलेल्या चार कसोटी मालिकेतील बंगळुरु कसोटी सामन्याची यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम सामना म्हणून निवड करण्यात आली. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथची सर्वोत्तम पाहुणा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.