‘अमूल’सारखी प्रसिद्ध डेअरी कशामुळे म्हणतेय, 10 कोटी नागरिकांचे आयुष्य होईल उद्ध्वस्त

नवी दिल्ली – भारतामधील सर्वात मोठी डेअरी ‘अमूल’ आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी लढणारी संस्था ‘पेटा’ यांच्यामध्ये सध्या दुधावरून वाद पेटला आहे आणि तो आता इतका टोकाला गेला आहे की, अमूलच्या उपाध्यक्षांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ‘पेटा’वर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे. या सर्वांचे मूळ ‘वेगन मिल्क’मध्ये आहे. ‘पेटा’च्या सल्ल्यांमुळे भारतामधील 10 कोटी नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, अशी भीती ‘अमूल’सारख्या डेअरीने व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षात पाश्‍चात्य देशात वेगन मिल्क (शाकाहारी दूध) हा प्रकार बाजारात उपलब्ध झाला आहे. पारंपारिक दुग्धजन्य पदार्थ म्हणूनही याकडे पाहिले जाते.

वेगन मिल्क म्हणजे वनस्पती आधारित रस असतो. त्याची चव व इतर गुणधर्म हे पारंपरिक दुधासारखेच असतात.

जनावरांचे दूध काढताना त्यांना वेदनादायी प्रक्रियेतून जावे लागते, असा समज असलेले लोक वेगन मिल्कला प्राधान्य देऊ लागले आहेत. दुग्धजन्य पदार्थांपासून अ‍ॅलर्जी असलेल्या लोकांना वेगन मिल्क हे एक वरदान ठरू शकते. मात्र, यावर वादही आहेत.

बाजारात सध्या उपलब्ध असलेले सोया मिल्क, आलमंड मिल्क, कोकोनट मिल्क, राईल मिल्क, काजू मिल्क हे काही प्रकार वेगन मिल्क म्हणूनही परिचित आहेत.

या वेगन मिल्कचे उत्पादन करण्याच्या ‘पेटा’च्या फुकटच्या सल्ल्यामुळे ‘अमूल’सारखी संस्था भडकली आहे. गायीच्या दुधाऐवजी वेगन मिल्क उत्पादनाकडे वळावे, असा सल्ला पेटाकडून अमूलला देण्यात आला आहे. त्यावर ‘प्लान्ट बेस्ड डेअरी’ उत्पादनांकडे वळल्यानंतर देशातील कोट्यवधी नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यास कशी मदत होईल ? असा प्रश्‍न अमूलने उपस्थित केला. शिवाय पेटाच्या वर्मावर नेमके बोट ठेवत विदेशी निधीद्वारे चालवण्यात येणार्‍या एनजीओने भारतीय डेअरी उद्योग नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात सुनावले आहे.

अमूलचे उपाध्यक्ष वालमजी हुंबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ‘भारतीय दुग्ध क्षेत्राची प्रतिमा डागाळत जवळपास 10 कोटी नागरिकांची आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार्‍या पेटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारतीय दूध उत्पादकांना बेरोजगार बनवण्याचा कट अशा संस्थांकडून रचला जात आहे’ असा आरोपही त्यांनी केला आहे.
कृत्रिम दूध तयार करणार्‍या मल्टीनॅशनल कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न ‘पेटा’सारख्या संस्था करत असल्याचा आरोपही लावण्यात आला आहे. दरम्यान, ‘पेटा’चे म्हणणे आहे की, वेगन चीज व योगर्टला लोकांमध्ये वाढती मागणी आहे. त्यामुळे बर्‍याच कंपन्या डेअर फ्री प्रॉडक्टस् बनवू लागल्या आहेत.