आलोक वर्मा उतरणार राजकीय आखाड्यात; येथून लढवू शकता निवडणूक?

0

नवी दिल्ली- सीबीआय आणि केंद्र सरकारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घमासान सुरु आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. सध्या एम नागेश्वर राव यांना हंगामी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. परंतु, आलोक वर्मा सरकारच्या या कारवाईमुळे सरकारवर नाराज असून त्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. सध्या सीबीआयमध्ये तपास सुरु आहे. याचदरम्यान आलोक वर्मा हे राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.

आलोक वर्मा यांनी दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे, असे भाजपाच्या विरोधकांकडून गटाकडून बोलले जात आहे. भाजपा सरकारवर विरोधी पक्ष नोटाबंदी, राफेल करार वरुन भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आलोक वर्मा यांचे मित्र आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी राजेश्वर सिंह हेही राजकारणात रुची असणारे आहेत. २०१७ मध्ये तर त्यांच्या हितचिंतकांनी राजेश्वर सिंह यांना नोएडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्नही केला होता. सध्या ज्या पद्धतीने वर्मा यांनी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. त्यावरुन ते राजकारणात उतरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दरम्यान, काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी वर्मा यांना संचालक पदावरुन हटवण्याच्या निर्णयावर निशाणा साधला होता. वर्मा हे राफेल व्यवहाराची चौकशी करत असल्यामुळेच त्यांना सरकारने पदावरुन हटवल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे.