“नसबंदी झाल्यावर मुलं होत नाहीत पण संजय राऊत असा चमत्कार…” संजय शिरसाट यांची जहरी टीका

संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला रोज काही ना काही बडबड करायची सवय आहे असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलत असताना शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यानंतर आता संजय शिरसाट हे चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले आहेत.

संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

“संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला रोज काही ना काही बडबड करुन कुणालाही नांदू द्यायचं नाही असा त्याचा चंग असतो. खरंतर त्याने आज जे स्टेटमेंट केलंय आम्हाला कोंबड्यांचा खुराडा वगैरे जे म्हणाला आहे, त्याने रमजानमध्ये शीरखुर्मा जास्त खाल्ल्याने त्याच्यावर कापायचा प्रभाव पडला आहे. ज्याची नसबंदी झालेली असते त्याला मुलं होत नाही म्हणतात. पण संजय राऊत हा असा चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यावरही आम्हाला मुलं होतील असं सांगतो आहे. १८ खासदारांपैकी १३ खासदार निघून गेले आहेत. पाच खासदार राहिले आहेत तरीही दावा १९ खासदार निवडून येतील हा दावा करणं हा मूर्खपणा संजय राऊत करतो आहे. त्यामुळेच हा पक्षही लयास गेला आहे.”

संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या ४० आमदारांवर टीका केली होती. “तुम्ही जो काय शिंदे-मिंधे गट म्हणत आहात त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहातच नाही. भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात, कधीही कुठल्याही कोंबड्या कापल्या जातील. हे लक्षात घ्या. तो पक्ष नाहीच, कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात. तसं ते बोलतात, पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय बैठक आहे? काय विचारधारा आहे? निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह विकत दिलं म्हणजे तो पक्ष ठरत नाही. त्या टोळीने ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे १९ खासदार होते. यावेळी ती संख्या कायम राहिल. कोण शिंदे मिंधे आहेत त्यांचे पाच खासदार आले तरी मोठी गोष्ट मानेन” असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला आता संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.संजय राऊत यांना राजकारणातला प्रेम चोपडा असं म्हटलं आहे.