विमानप्रवासासाठीही सक्तीचे होणार आधारकार्ड?

0

नवी दिल्ली – लवकरच विमानप्रवासासाठीही आधार कार्ड सक्तीचे होण्याची चिन्हे आहेत. मोदी सरकारने आयटी कंपनी विप्रोला ङ्गआधारफवर आधारित बायोमेट्रिक सिस्टिमची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यास सांगितले आहे. ही यंत्रणा प्रवाशांच्या आधार कार्डशी जोडलेली असेल आणि देशातील सर्व विमानतळावर यासाठी यंत्रणा उभारण्याची जबाबदारी विप्रोला सोपवण्यात आली आहे. मे महिन्याच्या प्रारंभी विप्रो आपला अहवाल सरकारला सोपवू शकते. त्यानंतर प्रवाशांच्या अंगठ्याच्या ठशाचा (थंब इम्प्रेशन) वापर विमान प्रवासासाठी ओळखपत्रासारखा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया फक्त देशांतर्गत प्रवासासाठी असेल. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्टची आवश्यकता असेल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान प्रवास बुकिंगला आधार क्रमांकाशी जोडणे आणि सर्व विमानतळांवर बायोमॅट्रिक्स व्यवस्था सुरू करण्याचा विचार करत आहे. याबाबत नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि या विभागाचे सचिव आर.एन.चौबे यांची नुकताच विविध विमान कंपन्या आणि अधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली होती. आधार कार्ड आधारित बायोमॅट्रिक यंत्रणेसंबंधी एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष गुरूप्रसाद मोहापात्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले, तिकिट बुकिंग करताना प्रवासी आपला आधार क्रमांक देईल. जेव्हा तो विमानतळावर जाईल. तेव्हा प्रवेशद्वाराजवळ असलेल्या टच पॅडवर त्याला आपला अंगठा ठेवावा लागेल. चेक इनच्या वेळी ही प्रक्रिया पुन्हा एकदा केली जाऊ शकते. प्रवाशांच्या सोयीसाठी हे करत असल्याचे त्यांनी म्हटले.

वाहन परवान्यासाठीही आवश्यक होऊ शकते आधारकार्ड
यापूर्वी वाहन परवान्यासाठी किंवा वाहन परवाना नूतनीकरण करण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले जाऊ शकते, असे वृत्त आले होते. एकाच नावाने अनेक वाहन परवाने काढण्यावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना आधार अनिर्वाय करण्यास सांगितले होते. यामुळे बनावट परवाने काढणे रोखता येईल, असे सरकारला वाटते.