वरणगांवात गावठी पिस्तुलासह एका युवकास अटक

जळगांव गुन्हे शाखेच्या पोलिसांची वरणगांवात कारवाई - शहरात खळबळ

वरणगांव | प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बसस्थानक चौकात सापळा रचून शहरातीलच एका युवकाला अटक केली . त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली . या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून भुसावळ शहरातील गुन्हेगारी लोण वरणगांव व परिसरात पाय पसरवू लागल्याचे समोर येत आहे .
वरणगांव शहरातील एक युवक गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण करीत असल्याची माहीती जळगांवच्या स्थानिक शाखेच्या विभागाला मिळाली होती . त्यानुसार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तसेच भुसावळ व मुक्ताईनगर विभागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील ( स्थानिक गुन्हे शाखा ) यांनी पथक तयार करून सदरहू युवकाचा शोध घेतला व वरणगांव बसस्थानक चौकाजवळील हॉटेल पारस जवळ उदय राजु उजलेकर (वय -२२ , रा. वरणगांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर जवळ ) यास सापळा रचून ताब्यात घेतले . यावेळी त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ परदेशी बनावटीचे गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे सापडल्याने पोलीसांनी त्याला अटक केली . या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनुस शेख इब्राहीम, पोहेकॉ दिपक पाटील, महेश महाजन, पो ना . किरण धनगर , प्रमोद लाड वंजारी, पोकॉ . रविंद्र पाटील, मुरलीधर बारी यांचा समावेश होता . शहरात खुलेआम गावठी पिस्तुल घेवून फिरणार्‍यास पोलीसांनी अटक केल्यामुळे एकच खळबळ उडाली .

भुसावळ गुन्हेगारीचे लोण वरणगांव पर्यंत
भुसावळ शहरातील गुन्हेगारी क्षेत्राचे लोण वरणगांव शहर व परिसरात पाय पसरवित असल्याचे मागील याच पद्धतीने केलेल्या कारवाईतून समोर येत आहे . चार महीन्या पूर्वी महामार्गावरील श्री साईबाबा मंदिरा जवळ दोन युवकांना गावठी पिस्तुल खरेदी – विक्रीच्या प्रकरणी अटक केली होती . यामध्ये वरणगांव फॅक्टरीतील एका युवकाचा समावेश होता तर याच पद्धतीने मलकापूर जि बुलढाणा येथील पोलीसांनी सापळा रचून गावठी पिस्तुल प्रकरणी दोन जणांना मलकापूर शहरात अटक केली होती यामध्येही वरणगांव फॅक्टरीतील युवकांचा समावेश होता .

पोलीसांनी दक्षता घेणे आवश्यक
वरणगांव शहर व परिसरात काही महिन्यां पासुन भुसावळ शहरा प्रमाणेच गुन्हेगारी क्षेत्राचे लोण पसरत आहे . यामुळे पोलीसांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मार्गावर असलेल्या युवकांवर वेळीच लक्ष केंद्रित करून त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे .