दोन ट्रॅपनंतर लाचखोर दुय्यम निबंधक जाळ्यात

उतार्‍यांसाठी लाच घेणे भोवले, एसीबीची कारवाई

पाचोरा – सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी अधिकारी ज्ञानदेव साहेबराव चव्हाण यांना 700 रुपयाची लाच चांगलीच भोवली. तहसील कार्यालय आवारातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी अधिकारी यांनी मयताच्या वारस दाखल्याच्या मूल्यांकनासाठी हवे असलेल्या उतार्‍याचे 100 रुपयांऐवजी 200 रुपये लाच मागितल्याने तक्रारदार वकिलाने जळगांव येथील लाचलुचपत विभागाकडे (ए.सी.बी.) तक्रार केली.

पाचोरा येथील तक्रारदार वकिलाला मयताचे वारस लावण्यासाठी मूल्यांकन करुन आठ उतारे हवे होते. एका उतार्‍याची शासकीय फी 100 रुपये असतांना प्रभारी दुय्यम निबंधक ज्ञानदेव साहेबराव चव्हाण यांनी 8 उतार्‍यांसाठी 1 हजार 600 रुपये फी मागितली. तक्रारदाराने 1 हजार 500 रुपयात तडजोड केली. दुय्यम निबंधकाने 700 रुपये जादा स्वीकारल्याने त्यांचेवर ए.सी.बी.च्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. दुय्यम निबंधक चव्हाण यांच्यावर यापूर्वीही दोन वेळा ट्रॅप लावण्याचा प्रयत्न झाला होता.

ए.सी.बी.च्या पथकाने सापळा लावून चव्हाण यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले. अधीक्षक गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक निलेश लोधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, रवींद्र माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहिरे, सुनील पाटील, पोलीस नाईक मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रविण पाटील, नसिर देशमुख, ईश्वर धनगर यांनी गुरुवारी दुपारी ज्ञानदेव साहेबराव चव्हाण यांना पकडून ताब्यात घेतले.

Copy