मध्यप्रदेशातून धुळ्यात तलवारी, प्राणघातक शस्त्रे आणणार्‍या टोळीला केली अटक

धुळे | प्रतिनिधी

मध्यप्रदेशातील इंदूर येथून प्राणघातक हत्यारे घेवून धुळ्याकडे निघालेल्या एका टोळीला शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेकपोस्टजवळ ताब्यात घेतले आहे. टोळीकडून मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली धारदार शस्त्रे राजस्थानमधून महाराष्ट्रात आणण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शिरपूर पोलिसांना 10 हजाराचे बक्षीस दिले आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांना या बाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड या सीमा तपासणी नाका येथे पांढर्‍या रंगाची कार थांबवली. या कारमधून धारदार शस्त्रांची वाहतूक करण्यात येत होती. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 12 तलवारींसह दोन गुप्ती, एक चॉपर, एक बटनाचा चाकू, दोन फायटर इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. आणि पोलिसांनी केलेल्या ह्या कारवाईत एक असा सुमारे 6 लाख 29 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सतपाल गिरधर सोनवणे, किरण नंदलाल दुधेकर, विकास देवा ठाकरे, सखाराम रामा पवार, सचिन राजेंद्र सोनवणे, राजू अशोक पवार, विशाल विजय ठाकरे, संतोष नामदेव पाटील, अमोल शांताराम चव्हाण, विठ्ठल सोनवणे हे सर्व राहणार धुळे तालुक्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिरपूर पोलिसांनी केलेल्या या दमदार कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी 10 हजार रुपयांचे रोख बक्षीसही शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना आणि त्यांच्या पथकाला दिले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक वातावरण ढवळले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने सोनगीरजवळ तब्बल 90 तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या तलवारी नेमक्या कुठून आणि कोणत्या उद्देशाने आणल्या जात होत्या? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. वर्षभरात तलवारी जप्त करण्याची ही तिसरी घटना आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.